25 April 2019

News Flash

चित्रकृती, मतदार जागरातून आंबेडकरांना अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर-चैत्यभूमीवर जनसागर एकवटू लागला आहे

(संग्रहित छायाचित्र)

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर समाजजागृतीचे उपक्रम

भारतातील सध्याच्या अस्वस्थ वर्तमानावर भाष्य करणाऱ्या चित्रकृती, निवडणुकीत मतदारांना स्वत:ला विकू देऊ नका, असा संदेश देणारी भित्तिपत्रके अशा समाजजागृती करणाऱ्या अनोख्या उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यात येत आहे.

सेक्युलर मूव्हमेंट या संघटनेच्या वतीने दादर-चैत्यभूमीवर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर प्रखर भाष्य करणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तर, फेसबुक आंबेडकरराइट मूव्हमेंट (फॅम) या युवकांच्या संघटनेच्या वतीने निवडणुकीत मतदारांना स्वतला विकू नका, असा संदेश देणाऱ्या भित्तिपत्रांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. केवळ अभिवादनापुरती चैत्यभूमी मर्यादित राहिली नसून आंबेडकरांना अपेक्षित असलेले सामाजिक जाणिवा घडविणारे व्यासपीठ म्हणूनही आकाराला येऊ लागली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर-चैत्यभूमीवर जनसागर एकवटू लागला आहे. दर वर्षीप्रमाणे या वेळी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, आदी महापुरुषांच्या प्रतिमा, पुतळे, यांची विक्री होत आहे. त्यांच्या जीवनावरील गाणी असणाऱ्या सीडींची मोठय़ा प्रमाणावर विक्री होते. मात्र चैत्यभूमीवर सर्वात जास्त विक्री होते ती पुस्तकांची तीन-चार दिवसांत लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते.

फॅम या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा स्टॉलही सर्वाचे लक्ष वेधून घेतो. आता काही महिन्यांतच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल. निकोप लोकशाहीसाठी भ्रष्टाचारमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पडायला हवी. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. निवडणुकीतील प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन करणारी भित्तिपत्रके छोटय़ा पुस्तिकांचे वाटप केले जात असल्याची माहिती ‘फॅम’चे अध्यक्ष अ‍ॅड. हरीश निरभवणे यांनी दिली. समजा अमूक उमेदवाराला मत देण्यासाठी दहा हजार रुपये दिले तर, पाच वर्षांचा हिशेब केल्यास मतदाराच्या हातात एका दिवसाला पाच रुपये ४७ पैसे येतात. हेच का तुमच्या मताचे आणि तुमचे मूल्य, असा सवाल करण्यात आला आहे.

‘अस्वस्थ भारतीय वर्तमान’

सेक्युलर मूव्हमेंटच्या वतीने चैत्यभूमीवर चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जे. जे. स्कूल ऑप आर्टमधील प्रा. मोग्गलान श्रावती व सेक्युलर मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे, उपाध्यक्ष भरत शेळके यांच्या हस्ते बुधवारी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.  अल्पसंख्याक यांच्यावर होणारे अत्याचार, धर्मनिरपेक्षतेची पायमल्ली अशा विविध विषयांवर भाष्य करणारी चित्रे रेखाटली आहेत. प्रदर्शन गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत सर्वासाठी हे खुले राहणार आहे.

First Published on December 6, 2018 2:52 am

Web Title: social welfare activities on chaityabhumi