मुंबई : ‘प्याऊ’ पाणपोयांच्या माध्यमातून रस्त्यांवरील गोरगरिबांना पिण्याचे स्वच्छ पाणी मोफत उपलब्ध करून देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका राणी पोद्दार यांचे गुरुवारी सकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने लोअर परळ येथील राहत्या घरी निधन झाले. राणी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या.

राणी पोद्दार या वस्त्रउद्योगातील एका १०० वर्षे जुन्या खासगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या. त्या ‘भारतीय व्यापारी संघटने’च्या  महिला शाखेच्या सदस्याही होत्या. ‘परोपकार’ या धार्मिक संस्थेचे समिती सदस्यत्व त्यांच्याकडे होते. राणी यांनी १९८० साली ‘पंचम’ ही बालसहाय्य संस्था सुरू केली. समाजातील वंचित गटातील लहान मुलांना निवारा उपलब्ध करून देणे, बालमेळावे घेणे, अपंग मुलांना माध्यान्ह भोजन उपलब्ध करून देणे इत्यादी काम ‘पंचम’ने के ली आहेत.