पाणीपट्टीच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या जाचक करातून मुक्तता;  व्यावसायिक ऐवजी निवासी दराने देयके

गृहनिर्माण संस्था किंवा इमारतींमध्ये रहिवाशांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळा अर्थात जिमना व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. या व्यायामशाळांना व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारली जात असल्याने गृहनिर्माण संस्थांना अवाजवी पाणीदेयके येत होती. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयामुळे हजारो सोसायटय़ांना दिलासा मिळणार आहे.

कांदिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आणि स्थानिक भाजप नेते गणेश खणकर यांनी पाठपुरावा करत पालिकेला हा कर रद्द करण्यास भाग पाडले आहे. संस्थांचा आक्षेप मान्य करत पालिकेने निवासी दराने पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शविली असून दोन आठवडय़ांच्या प्रतीक्षेनंतर तसा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर केला.

पुनर्विकासात अथवा नव्या भूखंडावर उभ्या राहणाऱ्या नव्या टोलेजंग इमारतींच्या आवारात स्थानिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या व्यायामशाळेला चटईक्षेत्र निर्देशांकातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात उभारण्यात आलेल्या सर्वच इमारतींत जिमसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या जलआकार नियमावलीमध्ये व्यायामशाळा / योगालयाच्या संकल्पनेचा समावेश नाही. तथापि, या व्यायामशाळा / योगालयांना पालिकेकडून नळजोडणी देण्यात आली असून त्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ासाठी व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारण्यात येत आहे.

इमारतीमध्ये २० ते २५ टक्के रहिवाशी व्यायामशाळा / योगालयाचा वापर करतात असे अंदाज बांधून पाणीपट्टीचा दर निश्चित केला आहे. प्रत्यक्षात अनेक सोसायटय़ांमधील काही ठराविक रहिवाशी या व्यायामशाळा / योगालयांचा वापर करीत आहेत. मात्र तरीही व्यावसायिक दराने आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचा भुर्दंड सोसायटीला सोसावा लागत आहे. त्यातही पाण्याचा वापर होतोच असे नाही.

कांदिवली येथील ओम हेमगिरी को-ऑप हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी विश्वनाथ कांबळे आणि भाजप नगरसेवक गणेश खणकर यांनी पालिका दरबारी सातत्याने पाठपुरावा करुन रहिवाशांना पाणीपट्टीपोटी सोसावा लागणऱ्या भरुदडाची बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार प्रशासनाने गृहनिर्माण संस्थेचे कार्यालय, व्यायामशाळा, वाचनालय, योगा केंद्र आदींना निवासी दराने पाणीपुरवठा करण्याची सुधारणा नियमात केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव २ ऑगस्ट रोजीच्या स्थायी समितीच्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केला होता. मात्र स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला. अखेर १४ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

३६ हजारांचा भुर्दंड

कांदिवली येथील ओम हेमगिरी को-ऑप हौसिंग सोसायटीमधील व्यायामशाळेला पालिकेकडून प्रतिदिन १,१२५ लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यासाठी प्रतिलिटर ५० रुपये ९९ पैसे पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. सोसायटीला पाठविण्यात आलेल्या पाणीपट्टीच्या बिलामधील १,१२५ लिटर पाण्यासाठी व्यावसायीक दराने आकारणी करण्यात येते. दर तीन महिन्यांनी पालिकेकडून सोसायटीला नऊ हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावे लागत आहेत. व्यावसायिक दराने आकारणी करण्यात येत असल्याने वर्षांकाठी ३६ हजार रुपये सोसायटीला भरावे लागत आहेत. मात्र भविष्यात निवासी दराने आकारणी झाल्यानंतर पाणीपट्टीचा बोजा हलका होईल, असे सोसायटीतील रहिवाशाने सांगितले.

निरोगी आरोग्याकरिता..

पालिकेच्या नियमानुसार एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या दोन टक्के किंवा २०० चौरस मीटर यापेक्षा जे क्षेत्रफळ कमी असेल तितके चटई क्षेत्रफळ (एफएसआय) योग केंद्र किंवा व्यायामशाळा म्हणून विकासकाला मोफत मिळते. रहिवाशांना आपले आरोग्य जपता यावे यासाठी पालिकेतर्फे हे प्रोत्साहनपूर्ण मोफत क्षेत्रफळ दिले जाते. परंतु, पालिकेच्या जिझीया करामुळे सदस्यांना ते खिशाला चाट पाडणारे ठरते आहे