News Flash

विकास आराखडय़ात सोसायटय़ांच्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव!

मुंबईच्या विकास आराखडय़ाच्या मसुदय़ात सुधारणा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

मुंबईच्या २०१४-३४ या काळातील विकास आराखडय़ाच्या मसुदय़ातमध्ये अनेक ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात काही सोसायटय़ांतील अंतर्गत रस्त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या रुंदीकरणामुळे काही इमारतींचे अस्तित्वच धोक्यात येणार असून काही इमारतींच्या आवारातील मोकळी जागा द्यावी लागणार आहे. परिणामी,  वाहने उभी करण्याच्या नव्या समस्येला रहिवाशांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे संतप्त झालेले रहिवासी विकास आराखडय़ाच्या विरोधात आंदोलनाची तयारी करीत आहेत.

मुंबईच्या विकास आराखडय़ाच्या मसुदय़ात सुधारणा करण्याचे काम सध्या सुरू आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने विकास आराखडय़ात मुंबईत अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण प्रस्तावित केले आहे. मुख्य रस्त्यांना जोडले जाणारे छोटय़ा रस्त्यांची रुंदी वाढविण्याचा विचार पालिका करीत आहे. त्याचबरोबर सोसायटय़ांतील अंतर्गत रस्ते आणि निवासी भागातील काही रस्त्यांचे रुंदीकरण मसुदय़ामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. एका ठिकाणी तर नाल्याचे रूपांतर रस्त्यामध्ये करण्याची तयारी मसुदय़ामध्ये करण्यात आली आहे.

सोसायटय़ांमधील अंतर्गत रस्ते ‘रहदारीचे रस्ते’ म्हणून दर्शवून भविष्यात त्यांचे विस्तारीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. हे रस्ते विकास आराखडय़ाच्या मसुदय़ामध्ये प्रस्तावित करण्यात आल्याने तेथील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न कळीचा मुद्दा बनू लागला आहे. विकास आराखडय़ाच्या मसुदय़ाला अंतिम मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत या इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी मिळणे अवघड आहे. परिणामी, मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईमधील निवासी भागातील काही अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण पालिकेने मसुदय़ात प्रस्तावित केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांना आपल्या आवारातील मोकळ्या जागेवर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पाणी सोडावे लागणार आहे. सध्या या इमारतींमधील रहिवाशांच्या गाडय़ा सोसायटय़ांतील मोकळ्या आवारात उभ्या केल्या जातात. भविष्यात ही मोकळी जागा रस्ता रुंदीकरणात गेल्यानंतर रहिवाशांना आपल्या गाडय़ा नाइलाजाने रस्त्यावर उभ्या कराव्या लागणार आहेत. रस्ता रुंद करतानाच दोन्ही बाजूला पदपथ बांधावे लागणार आहेत. त्यातच रहिवाशांचा गाडय़ा रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या तर वाहतुकीसाठी पूर्वीइतकीच जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुंदीकरणातून नवे प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशाच पद्धतीने काही औद्योगिक वसाहतींमधील रस्त्यांचे रुंदीकरणही प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबत रहिवाशांनी पालिकेकडे मोठय़ा प्रमाणावर सूचना, हरकती सादर केल्या आहेत.

नालाच प्रस्तावित रस्ता

विकास आराखडय़ामध्ये पार्लेश्वर नाला प्रस्तावित रस्ता म्हणून दाखविण्यात आला आहे. पावसाळ्यात हा नाला दुथडी भरून वाहत असतो. या नाल्याच्या आजूबाजूला महंत मार्ग, हनुमान मार्ग, हनुमान क्रॉस मार्ग, महात्मा गांधी मार्ग आदी रस्ते असून त्यांच्या मधून हा नाला वाहतो. आजूबाजूला इतके रस्ते असतानाही नाल्याचे रूपांतर रस्त्यामध्ये करण्याचा घाट मसुदय़ात घालण्यात आला आहे. या नाल्याचे रूपांतर रस्त्यामध्ये करण्यात आले तर पावसाळ्यात या भागात पूरस्थिती निर्माण होऊन आसपासचे रस्ते पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

पुनर्विकासाला खीळ

अंधेरी (पू.) येथील स्वामी नित्यानंद मार्गावरील दि चंद्रशेखर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जाण्यासाठी येथील विजयनगर सोसायटीमधून जाणाऱ्या संयुक्त रस्त्याचा वापर करावा लागतो. संयुक्त रस्त्यावरून पुढे गेल्यानंतर चंद्रशेखर सोसायटय़ांसमोर एक समांतर छोटा रस्ता असून या रस्त्याचा केवळ सोसायटीतील रहिवाशांसाठीच वापर होतो. असे असतानाही विकास आराखडय़ाच्या मसुदय़ात हा रहदारीचा रस्ता दाखविण्यात आला असून दोन्ही बाजूला त्याचा विस्तार प्रस्तावित करण्यात आला आहे. या विस्तारीकरणात विजयनगर सोसायटी आणि चंद्रशेखर सोसायटीतील प्रत्येकी एक इमारत आड येत आहे. केवळ सोसायटीसाठी असलेला हा अंतर्गत रस्ता ‘रहदारीचा रस्ता’ दाखविल्याने चंद्रशेखर सोसायटीतील इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे रहिवासी चिंतीत झाले आहेत.

महामार्गाना छोटे रस्ते जोडण्याचा घाट

पश्चिम द्रुतगती महामार्गाला अनेक ठिकाणी प्रस्तावित रस्ते जोडण्याची योजना मसुदय़ामध्ये आहे. विलेपार्ले येथे हनुमान जंक्शन व नेहरू मार्ग जंक्शन या दरम्यान तीन प्रस्तावित रस्ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडण्याचा विचार आहे. यासाठी द्रुतगती महामार्ग प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. यामुळे द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. विलेपार्ले (पू.) येथील गावठाण रोडमध्ये अनेक लहान रस्त्यांचा समावेश आहे. तेथे बैठय़ा घरांची संख्या अधिक असून या रस्त्यांचेही रुंदीकरण करण्यात आल्यास बैठय़ा घरांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. मसुदय़ामध्ये रुंदीकरण प्रस्तावित करण्यात आलेल्या हनुमान क्रॉस रस्ता-२ वर जेमतेम १० इमारती आहेत. हा रस्ता ६० फूट रुंद करण्याचा विचार आहे. मात्र पुढे तो ३० फूट रुंद रस्त्याला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे महंत क्रॉस रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

इमारतींचे अस्तित्व धोक्यात

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या वास्तव्यामुळे विलेपार्ले येथील प्रार्थना समाज मार्ग सर्वपरिचित होता. या मार्गाची रुंदी जेमतेम पाच फूट आणि लांबी ६० फूट इतकी आहे. हा रस्ता आता ३० फूट रुंद करण्याचे मसुदय़ात प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील इमारतींचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तर आसपासच्या रस्त्यांची रुंदी २० फुटावरून ३० फूट करण्याचे सुचविण्यात आले आहे.

निवासी भागातील रस्ते रुंदीकरण प्रस्तावित केल्यानंतर नव्या समस्या निर्माण होतील आणि पालिकेला या समस्यांना तोंड द्यावे लागेल. आजघडीला सोसायटीच्या आरावात उभ्या राहणारी वाहने भविष्यात रस्त्यावरील जागा अडवतील आणि रुंदीकरणांमुळे निर्माण होणाऱ्या नव्या प्रश्नांवर मलमपट्टी करण्याची वेळ पालिकेवर येईल.

विजय फुलकर, वास्तुविशारद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:15 am

Web Title: society internal road winding project
टॅग : Society
Next Stories
1 प्रयोग म्हणून दिलेली जबाबदारी स्त्रियांकडून यशस्वी
2 एकटीच्या संघर्षांत घरच्यांचे पाठबळ मनोबल देणारे
3 आजही क्षमता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा
Just Now!
X