रामदास आठवले यांचे मत ; ऐक्यासाठी समितीची स्थापना

रिपब्लिकन पक्षातील गटबाजीला नेत्यांबरोबरच, कार्यकर्ते व समाजही तितकाच जबाबदार आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आठवले यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या एका बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पराभवामुळे रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व अन्य आंबेडकरवादी संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून पुन्हा रिपब्लिकन ऐक्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रस्थापित नेतृत्वाला वगळून रिपब्लिकन आघाडीची नव्याने बांधणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संदर्भात १६ एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत एका पक्षाऐवजी रिपब्लिकन आघाडी उभी करावी, असा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाच्या जे.पी.नाईक भवनमध्ये सोमवारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते, विचारवंत, प्राध्यापक यांची बैठक झाली. त्यात राजकीय यश मिळविण्यासाठी एकच रिपब्लिकन पक्ष असावा, म्हणजे रिपब्लिकन ऐक्य करावे, अशा सूचना करण्यात आल्या. त्यावर रिपब्लिकन ऐक्य कसे करता येईल व ते कायमस्वरूपी कसे टिकेल, याचा अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात डॉ. पी.जी. जोगदंड, सुनील खोब्रागडे, बबन कांबळे, प्रा. विजय खरे, डॉ. संगीता पवार, डॉ. बी.बी. मेश्राम, डॉ. जी.के. डोंगरगावकर, डॉ. मंगेश बनसोड, वैभव छाया व अशोक कांबळे यांचा समावेश आहे. या बैठकीला अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, मधु मोहिते, चंद्रशेखर कांबळे, काकासाहेब खंबाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेक गट निर्माण होतात, त्याला नेत्यांबरोबरच कार्यकर्ते व समाजही तितकाच जबाबदार आहे, असे मत रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. रिपब्लिकन पक्षाचा नेता कुणी व्हायचे यावरून वाद होतात. आतापर्यंत रिपब्लिकन ऐक्य म्हणजे बौद्धांचे ऐक्य होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षाला व्यापक करायचे असेल, तर सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यात सामावून घेतले पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. रिपब्लिकन ऐक्यासाठी आपला गट बरखास्त करण्याची आणि समाज ठरवेल त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी आहे, असे आठवले म्हणाले.

निवडणूक पद्धतीत बदल हवा

सध्याच्या निवडणूक पद्धतीत लहान पक्षांना राजकीय यश मिळणे अवघड आहे, त्यामुळे त्यात बदल करणे आवश्यक आहे. पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीप्रमाणे लोकप्रतिनिधींची संख्या ठरविली पाहिजे. तशी  निवडणूक पद्धतीत सुधारणा केली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र त्यासाठी घटनेत बदल करावा लागणार आहे, ते कितपत शक्य होईल, याबद्दल रामदास आठवले यांनी साशंकताही बोलून दाखविली. मात्र सध्याची निवडणूक पद्धती बदलली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.