तुम्हाला दोन पैसे मिळाले तर एका पैशाचे धान्य आणा आणि एका पैशाचे फूल आणा. एका पैशाचे धान्य तुम्हाला जगवेल तर एका पैशाचे फूल तुम्हाला कशासाठी जगायचे ते शिकवेल, अशा अर्थाची एक चिनी म्हण आहे. ती किती सार्थ आहे हे आपण आपल्या आजूबाजूला वावरतो तेव्हा कळून येते. माणसाची किंवा समाजाची सांस्कृतिक गरजही तेवढीच महत्त्वाची असून ताण-तणाव, स्पर्धा, निराशा यातून माणसाला नवी उमेद आणि उत्साह मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम सांस्कृतिक क्षेत्र करीत असते. आजच्या ‘सेकंड इनिंग’मधील व्यक्तिमत्त्व गेली काही वर्षे ‘सामाजिक-सांस्कृतिक दूत’ म्हणून काम करीत आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी याच कामाला वाहून घेतले असून त्यांचे नाव आहे श्रीकांत आठल्ये. अंबरनाथ येथील ‘मनोहर कला सांस्कृतिक विश्वस्त न्यास’चे प्रमुख विश्वस्त म्हणून ते काम करीत आहेत.

आठल्ये यांचा जन्म जुन्नरचा. पुण्यातील ‘महाराष्ट्र मंडळ’ या सैनिकी शिक्षण देणाऱ्या विद्यालयाच्या स्थापनेत श्रीकांत आठल्ये यांच्या वडिलांचे- बाळकृष्ण आठल्ये यांचेही महत्त्वाचे योगदान होते. पुण्यातील प्लेगच्या साथीत त्यांचे वडील आणि सहकाऱ्यांनी प्लेगग्रस्त लोकांची सेवा केली. आठल्ये यांना अशा प्रकारे वडिलांकडूनच सामाजिक सेवेचा वसा मिळाला. १९६०-६१ च्या सुमारास श्रीकांत आठल्ये हे मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिरातून ‘एसएससी’ झाले. त्यानंतर त्यांनी ‘नॅशनल अ‍ॅप्रेन्टिसशिप स्कीम’ (एनएटीएस)चा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. मग वडाळा येथील ‘अ‍ॅक्मे’, ‘कमानी टय़ूब’ या ठिकाणी काही काळ त्यांनी नोकरी केली. ‘रॅली’ कंपनीत ‘क्वालिटी कंट्रोल इंजिनीयर’ म्हणून ३५ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले. १९७० मध्ये लग्न झाल्यानंतर ते दादर येथून अंबरनाथ येथे राहायला गेले.

एके दिवशी अंबरनाथ येथे बालमोहन शाळेतील श्रीखंडेबाई त्यांना भेटल्या. आठल्ये यांनी बाईंना आपली ओळख दिली. श्रीखंडेबाई अंबरनाथ येथेच आठल्ये यांच्या घराजवळच राहत होत्या. श्रीखंडेबाई यांचे पती मनोहर श्रीखंडे हे बृहन्मुंबई महापालिकेत मोठय़ा पदावर नोकरीला होते. श्रीखंडे दाम्पत्याने त्यांच्या इस्टेटीचा ‘मनोहर कला सांस्कृतिक ट्रस्ट’ तयार केला होता. श्रीखंडे दाम्पत्याच्या हयातीतच त्यांच्या सांगण्यावरून आठल्ये यांनी ट्रस्टसाठी मीना गलियार व कामिनी पुत्रन यांच्याबरोबर मानद सेवा द्यायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्षेत्रात ट्रस्टने काम करावे अशी श्रीखंडे दाम्पत्याची इच्छा होती. त्यांच्या परीने हे दाम्पत्य जमेल तसे काम करीतच होते. मीना गलियार आणि कामिनी पुत्रन यांनी काही कारणाने ट्रस्टचे काम करणे थांबविले. त्यामुळे श्रीखंडे दाम्पत्याच्या निधनानंतर ट्रस्टच्या कामासाठी आठल्ये यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. सध्या आठल्ये यांच्यासोबत संध्या म्हात्रे (महिला विभाग) व नरेंद्र गोरे (नाटक व सांस्कृतिक विभाग) हे काम करीत आहेत.

सुरुवातीला अंबरनाथ ज्येष्ठ नागरिक महिला संघ, सुयोग महिला मंडळ आणि अन्य सहकाऱ्यांना मदतीला घेऊन ट्रस्टतर्फे नृत्य, गायन याचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. अंबरनाथमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मनाचे श्लोक पाठांतर’ स्पर्धा, पन्नाशीपुढील महिलांसाठी योगासन, पौरोहित्य वर्ग असे सुरू केले. कोणतेही शुल्क न घेता हे उपक्रम चालविले हे यांचे वैशिष्टय़. भारतीय प्रशासन आणि राज्य सेवा आदी स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टने आता अभ्यासिका सुरूकेली असून ३० विद्यार्थी त्याचा नि:शुल्क लाभ घेत आहेत. या विद्यार्थ्यांना पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली जातात. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही अभ्यासिका सुरू असते. या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण व कौशल्य वर्गही चालविले जातात. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, इंग्रजी आणि संस्कृत विषयाचे मार्गदर्शन वर्गही चालविण्यात येत होते. ‘एक देश, एक वक्ता’ हा एक आगळा उपक्रमही ट्रस्टतर्फे चालविण्यात येतो. आपल्या शेजारील राष्ट्रांची ओळख स्लाइड शोच्या माध्यमातून करून देण्यात येते. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी हा उपक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमाला आता ‘केसरी टूर्स’चे सहकार्य मिळाले असून प्रवीण कारखानीस यांच्यासह तज्ज्ञ मंडळींची येथे व्याख्याने झाली आहेत. अंबरनाथमधील हौशी चित्रकारांसाठी ट्रस्टने पुढाकार घेतला असून मूर्तिकार काळे, चित्रकार अनंत कुलकर्णी, प्रकाश जोशी यांनी मार्गदर्शन करण्यासाठी वेळ देण्याचे मान्य केले आहे. अंबरनाथमधील हौशी कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी आता ट्रस्ट प्रयत्न करीत आहे.

गाणे, नृत्य, अभिनय यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ निर्माण करण्याचा तसेच अंबरनाथमधील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती, त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री, त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचा ट्रस्टचा मानस आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा सुदृढ असलेल्या वृद्धांनी वृद्धाश्रमाऐवजी आदिवासी पाडय़ातील एखाद्या कुटुंबात ‘पालक’ म्हणून राहावे, त्या कुटुंबात राहून त्यांना जमेल तशी मदत करावी. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा त्या आदिवासी कुटुंबाला फायदा करून द्यावा, अशी एक संकल्पना आठल्ये यांच्या डोक्यात असून वयाच्या ७३ व्या वर्षांतही आठल्ये यांचे काम सुरू आहे. घराजवळील ‘विरंगुळा’ वृद्धाश्रमातही आठल्ये काही वेळ देत असतात. आठल्ये यांच्या या कामात त्यांना त्यांची पत्नी मेधा, दोन पुत्र डॉ. शैलेश, मंगेश, सुना मधुरा व वैशाली यांचे सहकार्य आणि पाठिंबा आहे. त्यांच्यामुळेच आपण हे काम करू शकतो, असे ते सांगतात.