गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती बनावट चकमकीप्रकरणी मुंबईत सुरू असलेल्या खटल्यात भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अन्य आरोपींची नार्को चाचणी करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी सोहराबुद्दीनच्या भावाने शुक्रवारी एका अर्जाद्वारे विशेष न्यायालयाकडे केली.
सीबीआयच्या तीव्र विरोधानंतरही न्यायालयाने शहा यांना पुन्हा एकदा सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा दिली. पक्षाची राष्ट्रीय बैठक असल्याचे सांगत शहा यांनी गैरहजर राहण्याची परवानगी मागितली होती. सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाउद्दीनने केलेल्या अर्जावर न्यायालय १४ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे. आपल्या भावाच्या बनावट चकमकीमागील नेमका सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयला अद्याप निश्चित करता आलेले नाही. त्यामुळे शहा यांच्यासह खटल्यातील प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका स्पष्ट होण्यासाठी त्यांच्या नार्को चाचणीचे आदेश द्यावेत, अशी त्याची मागणी आहे.
सीबीआयने शहा यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर या दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे आरोपपत्र दाखल केले होते. दोन्ही खटले महाराष्ट्रात वर्ग करण्यात आल्यावर त्यांची सध्या विशेष सीबीआय न्यायालयात एकत्रित सुनावणी सुरू आहे. सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे अपहरण करून गुजरात पोलिसांनी त्यांची हत्या केली व ती चकमक दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच या चकमकीचा एकमेव साक्षीदार तुलसीराम प्रजापतीचीही अशाचप्रकारे गुजरात पोलिसांनी हत्या केली. या घटनांच्या वेळी गुजरातच्या गृहमंत्रीपदी शहा हे होते.