पालिकेच्या विभाग कार्यालयाला सौर वीजपुरवठा; महिन्याला ७० हजार रुपयांची बचत

मुंबई महापालिकेने आपल्या विभाग कार्यालयाच्या इमारतीमध्ये सौर ऊर्जा निर्मितीचा श्रीगणेशा करीत वीज बिलापोटी येणाऱ्या खर्चात बचत करण्याचा मंत्र जपण्यास सुरुवात केली आहे. सौर ऊर्जा निर्मितीमुळे ‘बी’ विभाग कार्यालयाला वीज बिलापोटी येणाऱ्या खर्चात महिन्याकाठी सुमारे ७० हजार रुपयांची बचत होणार आहे. पालिकेच्या आपल्या विभाग कार्यालयाच्या इमारतीत प्रथमच सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयोग केला आहे.

डोंगरी, उमरखाडी, भातबाजार, मोहम्मद अली रोड आणि आसपासच्या परिसरात नागरी सुविधा पुरविणाऱ्या पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाला ‘बेस्ट उपक्रमा’कडून विद्युतपुरवठा करण्यात येतो. दर महिन्याला वीज बिलापोटी पालिकेला साधारण ३ लाख रुपये खर्च येतो. म्हणजे वर्षांकाठी ३६ लाख रुपये वीज बिलापोटी पालिकेला बेस्टमध्ये भरावे लागत होते. बेस्टकडून ‘बी’ विभाग कार्यालयाला २० किलोवॉट क्षमतेचा मीटर देण्यात आला होता. ‘बी’ विभाग कार्यालयाच्या इमारतीसाठी साधारण ८० ते ९० किलोवॉट विजेची गरज आहे. गरज अधिक आणि पुरवठा मर्यादित यामुळे अधूनमधून या इमारतीचा विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावरही होऊ लागली होता. त्यामुळे विभाग कार्यालयाला वीज बिलापोटी येणारा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला होता.

पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण करून ‘बी’ विभाग कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली होती.   कंत्राटदाराने इमारतीच्या गच्चीवर २० किलोवॉट सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला असून दोनच दिवसांपूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. इमारतील आवश्यक असलेल्या विजेच्या तुलनेत २० टक्के वीज या प्रकल्पातून उपलब्ध होणार आहे. सध्या २० किलोवॉट ऑन ग्रीड प्रकल्प बसविल्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करावा लागणार आहे. भविष्यात ऑफ ग्रीड युनिट बसविल्यानंतर या प्रकल्पात निर्माण होणारी वीज बॅटरीच्या माध्यमातून साठवून ठेवण्याचा पर्यायही पालिकेला उपलब्ध होणार आहे.

विभाग कार्यालयाच्या गच्चीमध्ये १० बाय १३ मीटर क्षेत्रफळ जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला असून हा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेला साधारण १८ लाख रुपये खर्च आला आहे. सौर ऊर्जा निर्मितीमुळे दर महिन्याला वीज बिलामध्ये ७० हजार रुपयांची, म्हणजेच वर्षांकाठी ८.४० लाख रुपयांची बचत होऊ शकेल. वर्षांला साधारण सरासरी पाच लाख रुपये बचत झाली, तरी चार वर्षांमध्ये या प्रकल्पावरील पालिकेचा खर्च वसूल होऊ शकेल, असा अंदाज पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत पालिकेची २४ विभाग कार्यालर्ये आहेत. वीज बचतीसाठी ‘बी’ विभाग कार्यालयाने पहिले पाऊल टाकले आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य विभाग कार्यालयात तो उभारल्यास पालिकेची लाखो रुपयांची बचत होईल आणि ते पैसे नागरी कामांवर खर्च करता येऊ शकतील.

उदयकुमार शिरुरकर, साहाय्यक आयुक्त, बी विभाग कार्यालय