• मेट्रो स्थानकांवर सौरऊर्जेसाठी करार
  • महिनाभरात दोन स्थानकांवर सौरपटल बसवणार

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मुंबईतील पहिल्यावहिल्या मेट्रोने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा वसा घेतला असून त्यासाठी रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि. या कंपनीने मेट्रोच्या दुसऱ्या वर्धापन दिनी ‘गो ग्रीन’चा नारा दिला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता मेट्रो मार्गावरील सर्व स्थानकांवर सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी अंधेरी आणि घाटकोपर या स्थानकांवर पुढील महिनाभरात सौरपटल बसवण्याचे काम सुरू होणार असून त्यासाठी संबंधित कंपन्यांशी करार झाले आहेत. या प्रकल्पातून स्थानकावर लागणाऱ्या एकूण विजेपैकी ३० टक्के वीज सौरऊर्जेद्वारे मिळणार आहे.

अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे सौरऊर्जेकडे जाणार असल्याचे सूतोवाच केले होते. मुंबई मेट्रोवनने त्यापुढे जात आपल्या स्थानकांवर सौरपटल उभारून सौरऊर्जेचा मार्ग अवलंबला आहे. त्यासाठीचे करार करण्यात आले असून या करारानुसार सौरपटल उभारण्याचा आणि त्या अनुषंगाने येणारा इतर खर्च रिन्युएबल एनर्जी सव्हिस कंपनीद्वारे करणार आहे. त्या बदल्यात मुंबई मेट्रोवनला ५.१० रुपये प्रतियुनिट एवढय़ा दरात वीज मिळेल.

या प्रकल्पाची सुरुवात म्हणून अंधेरी आणि घाटकोपर या दोन स्थानकांवर सौरपटल बसवण्यात येणार आहेत. या सौरपटलांद्वारे २.३० मेगाव्ॉट एवढी वीज निर्माण होणार आहे. सध्या मेट्रो स्थानकांची परिचालनवगळता विजेची गरज ६.९० मेगाव्ॉट एवढी आहे. त्यामुळे ३० टक्के गरज ही सौरऊर्जेमुळे भागणार आहे. ही वीज स्थानकातील प्रकाश यंत्रणा, वातानुकूलन, तिकीट यंत्रणा आदी गोष्टींसाठी वापरली जाणार आहे, असे रिलायन्स मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांनी सांगितले.