मुंबई : मुख्य वीज केंद्रात झालेल्या बिघाडामुळे नुकताच मुंबईतील वीजपुरवठा सुमारे सहा तासांसाठी खंडित करावा लागला. त्यामुळे काही परिसरात पाणीपुरवठय़ावरही परिणाम झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप येथील मुख्य जलसाठा केंद्रात मोठय़ा क्षमतेने सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यास पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तरी मुंबईचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही, असा विश्वास मुख्य जलअभियंता अजय राठोड यांनी व्यक्त केला.

मुंबईला प्रामुख्याने भातसा आणि मध्य वैतरणा धरणांतून सुमारे १४० किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. मध्य वैतरणा ते शहापूर-पिसे पांजरापूर असे मार्गक्रमण करीत भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे वेरावली तीन प्रकल्पातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण काळात विजेवर चालणाऱ्या मोठमोठय़ा पंपांचा वापर केला जातो. त्यासाठी जनरेटरची यंत्रणा पुरेशी नाही.

भांडुप संकुलासाठी टाटा वीज कंपनीने दोन स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. गेल्या २५ वर्षांत इतका दीर्घकाळ वीज खंडित होण्याचा प्रकार कधीही घडला नाही. याशिवाय अडीच मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पही भांडुप संकुलात आहे. आणखी एक सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. पिसे-पांजरापूर येथेही छोटा सौरऊर्जा प्रकल्प आहे. मध्य वैतरणा येथे जलविद्युत तरंगणारा सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यामुळे ही सर्व यंत्रणा वीजपुरवठा खंडित झाला तरी कार्यान्वित राहावी, यासाठी प्रयत्न करावा लागणार असल्याकडे राठोड यांनी लक्ष वेधले.