विद्याविहार येथील ‘के.जे.सोमय्या विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया’कडून बारावी परीक्षेच्या ओळखपत्रावर झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून बेकायदा ५०० रुपये गोळा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रकाराची तक्रार ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे केल्यानंतर मंडळाच्या विभागीय कार्यालयाने याची गंभीर दखल घेत सोमय्या महाविद्यालयाला कारणे ‘दाखवा नोटीस’ बजावली. महाविद्यालय नेमक्या कोणत्या कारणासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत आहे, याचा खुलासा मंडळाने महाविद्यालयाकडून मागविला आहे.
‘वास्तविक मंडळाकडून बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्व-यादी प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालये या माहितीशी आपल्याकडील माहिती पडताळून पाहतात. त्यात दुरुस्त्या असल्यास त्या मंडळाला कळविल्या जातात. या दुरुस्त्यांनंतर प्रत्यक्ष ओळखपत्रे तयार होतात,’ असा खुलासा मंडळाची बाजू मांडताना मुंबई विभागाचे सचिव सु. बा. गायकवाड यांनी केला.
सोमय्या महाविद्यालय मात्र मनमानी पद्धतीने दुरुस्तीकरिता विद्यार्थ्यांकडूनच ५०० रुपयांचा दंड आकारत असल्याची येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार होती. विद्यार्थी बारावी परीक्षेच्या अभ्यासात गुंतलेले असताना त्यांची अशी पिळवणूक करणे योग्य नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे अमोल मातेले यांनी संबंधित महाविद्यालयाकडून जबर आर्थिक दंड वसूल करण्याची मागणी केली.