आनंद कुलकर्णीसाठी खांदेपालट?
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ऐकत नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नापसंती व्यक्त केल्यानंतर आता प्रशासनात मोठे फेरबदल केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील व सध्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांना आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
कुलकर्णी यांना मुख्य सचिवपदाबरोबरच पुढील काही कालावधी मुदतवाढही द्यावी लागणार आहे, त्यासाठी सावधपणे निर्णय घ्यावा लागणार आहे, असे सांगण्यात येते.
मुख्य सचिव क्षत्रिय यांना निवृत्तीसाठी आणखी एक वर्ष बाकी आहे. त्यांना केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवून, त्यांच्या जागी अपर मुख्य सचिव असलेले आनंद कुलकर्णी यांची वर्णी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार क्षत्रिय यांच्यानंतर मुख्य सचिवपदासाठी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांचा क्रमांक आहे. परंतु अपर मुख्य सचिवांपैकी कोणाही एकाची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.