‘विचारांचे सोने लुटायला चला’ असा नारा देत शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी पार पडतो. या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांची मोठी गर्दी असते. शनिवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यालाही शिवसैनिकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. मात्र दसरा मेळावा संपल्यावर काही शिवसैनिक कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटले असा दावा मनसेने केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या संदर्भातला फोटोच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट केला आहे. तसेच मनसेच्या ‘एमएनएस अधिकृत’ या फेसबुक पेजवरही ही बातमी देण्यात आली आहे.

दसरा मेळावा संपल्यावर काही शिवसैनिकांचा एक समूह राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थाजवळ आला. राज ठाकरे त्यावेळी तळमजल्यावरील काचा असलेल्या खोलीत होते. राज ठाकरे दिसत असल्यामुळे काही शिवसैनिक त्या ठिकाणी थांबले, त्यांनी राज ठाकरेंना बाहेर येण्याची विनंती केली. तसेच त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या. राज ठाकरेंनी सुरूवातीला या सगळ्यांना आतूनच दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र शिवसैनिकांचा आग्रह त्यांना मोडवला गेला नाही. मग राज ठाकरे बाहेर आले आणि त्यांनी अनेक शिवसैनिकांसोबत हात मिळवून त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरे आणि काही शिवसैनिकांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना आणि राज ठाकरे यांचे जुने नाते सर्वांना ठाऊक आहेच, अशात दसरा मेळावा संपल्यानंतर झालेल्या या घटनेमुळे शिवसेना आणि राज ठाकरे यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना विठ्ठल मानत जेव्हा शिवसेना सोडली तेव्हापासूनच खरेतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. ती पूर्ण होईल की नाही याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. मात्र सध्या मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या या फोटोची चर्चा चांगलीच रंगताना दिसते आहे.