स्वत:च्या आईला धडा शिकवण्यासाठी सांताक्रूझ येथील एका तरुणाने तिच्याच मोबाईलवरून बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी करून काही काळ तणाव निर्माण केला.
शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक दूरध्वनी आला होता. अंधेरी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती; परंतु हा दूरध्वनी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा अंधेरी रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या मोबाइल क्रमांकावरून हा दूरध्वनी आला होता, त्याचा शोध घेऊन महिलेच्या घरी पोहोचले. चौकशीनंतर या महिलेच्या मुलानेच हा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. या मुलाचे आपल्या आईशी भांडण झाले होते.