विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी मुंबई दाखल झाले. शेतकऱ्यांच्या या शांततापूर्ण मोर्चाला सर्वच स्तरातून अभूतपूर्व पाठिंब मिळत आहे. मराठी कलाविश्वदेखील शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असून रितेश देशमुख, सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी यांसारख्या कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून बळीराजाला साथ दिली आहे.

१८० किलोमीटर पायपीट करत रक्ताळलेल्या पायांनी मुंबईत दाखल झालेल्या बळीराजाचा मराठी कलाविश्वाला विसर पडला का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर रितेश देशमुख आणि सोनाली कुलकर्णीने ट्विट करत शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. तर मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे मोबाईल चार्ज करता यावे यासाठी सोलार पाटी डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या एका शेतकऱ्याचा उल्लेख अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केला. त्याचप्रमाणे मोर्चावर टीका करणाऱ्यांवरही तिने निशाणा साधला. ‘तळतळत्या उन्हात पावलं भाजत असताना हे काका घरातलं सोलर पॅनल घेऊन आलेत डोक्यावर वाहून.. अडल्या नडल्या बाई बाप्यांचे मोबाईल फोन त्यांना चार्ज करता यावेत म्हणून! आणि आमच्या एसी गाड्यांतून जाताना आमच्या डोक्यात पहिला विचार येतोय की, काय हे भिकेचे डोहाळे.. पैसे देऊन आणला असणार एवढा मॉब.. नको तेव्हा निघतात यार ट्रॅफिकची आई बहीण करायला. त्यांच्यातल्या माणूसपणाच्या खुणा बेधडक पुसून टाकणाऱ्या आमच्या शहरीपणाची कीव,’ असे म्हणत मोर्चावर टीका करणाऱ्यांना स्पृहाने खडेबोल सुनावले.

Kisan Long March: रितेशनेही दिला ‘जय किसान’चा नारा, ट्विट करत म्हणाला…

सोनाली कुलकर्णीनेही बळीराजाला साथ दिली. ‘आपण अत्यंत आरामदायी जीवन जगताना आपल्या अन्नदात्याचा थोडा तरी विचार करतो का? या शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत पायपीट करावी लागली. त्यांचा आवाज ऐकूयात आणि शेतकऱ्यांना आणखी बळ मिळावे यासाठी प्रार्थना करुयात,’ असे ट्विट तिने केले.