पी. चिदंबरम तपास यंत्रणांसमोर आपलं एखादं महत्वाचं गुपित उघड करतील, या भीतीने काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तिहार तुरुंगात त्यांच्या भेटीला गेले असल्याचा टोला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.


मुनगंटीवार म्हणाले, “चिदंबरम यांची भेट घेण हे काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांसाठी सक्तीचे बनले असावे किंवा आपलं एखाद गुपित ते ईडी किंवा सीबीआयसमोर उघड करतील या भीतीमुळेच त्यांनी तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेतली असावी.”

चिदंबरम यांच्या भेटीसाठी सोनिया गांधी, मनमोहन सिंग तिहार तुरूंगात

दरम्यान, चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह सोमवारी सकाळी नऊ वाजता तिहार तुरूंगात पोहोचले होते. ईडी आणि सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या चिदंबरम यांच्या पाठिशी काँग्रेस असल्याचे दर्शवण्यासाठी सोनिया गांधी या चिदंबरम यांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे.

आयएनएक्स मीडियातील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली होती. २१ ऑगस्ट रोजी सीबीआय आणि ईडीनेही कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआय कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. महिनाभरापासून चिदंबरम तुरूंगात असून, गेल्या आठवड्यातच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.