13 December 2019

News Flash

काँग्रेसच्या इतिहासात ४४ वर्षे अध्यक्षपद गांधी-नेहरू घराण्यातच!

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली.

|| संतोष प्रधान

काँग्रेस पक्षाच्या १३४ वर्षांच्या इतिहासात तब्बल ४४ वर्षे अध्यक्षपद हे नेहरू-गांधी कुटुंबीयांनी भूषविले आहे. यात अध्यक्षपदी फेरनिवड झालेल्या सोनिया गांधी यांनी सर्वाधिक १९ वर्षे अध्यक्षपद सांभाळले.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. ही करताना पुढील अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नसेल, असे सूतोवाच केले होते. पण काँग्रेसमधील नव्या-जुन्या नेत्यांच्या वादात पुन्हा अध्यक्षपद हे सोनिया गांधी यांच्याकडे सोपविण्यात आले. सोनियांची हंगामी अध्यक्षपदी निवड झाली असली तरी लगेचच नव्या अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता दिसत नाही.

काँग्रेस पक्षाच्या इतिहासात गांधी-नेहरू घराण्यातील नेत्यांनी तब्बल ४३ वर्षे आणि सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत अध्यक्षपद भूषविले आहे. मोतीलाल नेहरू यांनी १९१९ मध्ये पहिल्यांदा अध्यक्षपद भूषविले होते. यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आठ वर्षे टप्प्याटप्प्याने अध्यक्षपद भूषविले होते. स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांत तब्बल ३७ वर्षे आणि सहा महिने अध्यक्षपद नेहरू-गांधी घराण्यातच राहिले आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर निम्म्या कारकीर्दीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व हे नेहरू-गांधी घराण्याने केले.

सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्राची सत्ता मिळाली. पण २०१४ मध्ये सोनियांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसची पीछेहाट सुरू झाली. राहुल गांधी यांना उत्तराधिकारी म्हणून सोनियांनी पुढे आणले पण तेसुद्धा अपयशी ठरले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांची सत्ता मिळाली. लोकसभा निवडणुकीत मात्र पार धुव्वा उडाला.

सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपद आल्याने पक्षातील जुन्या मंडळींच्या हाती सारी सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत. माजी राजकीय सचिव अहमद पटेल आणि त्यांचा गोतावळा यांचे पक्षात महत्त्व वाढविण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांचे खच्चीकरण केले जाण्याची शक्यता पक्षात वर्तविली जाते.

पक्षाध्यक्षपदाची कारकीर्द

  • मोतीलाल नेहरू – दोन वर्षे
  • जवाहरलाल नेहरू – ८ वर्षे
  • इंदिरा गांधी – ७ वर्षे
  • राजीव गांधी – ६ वर्षे
  • सोनिया गांधी – १९ वर्षे
  • राहुल गांधी – दीड वर्षे

First Published on August 12, 2019 1:22 am

Web Title: sonia gandhi rahul gandhi congress party mpg 94
Just Now!
X