लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून राज्यात काँग्रेसमध्ये पडझड सुरू आहे. मुंबई काँग्रेसही याला अपवाद राहिलेली नसून, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसला ‘हात’ दिला आहे. दोघांच्याही राजीनाम्याचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहचले असून, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना दिल्लीत बोलावले आहे.

सहा महिन्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षातील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडली. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनीही राजीनामा देत काँग्रेसला धक्का दिला. कृपाशंकर सिंह भाजपात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, मातोंडकर यांच्या राजीनाम्याने मुंबई काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना काँग्रेसने उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली होती. भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. पक्षातील काही नेत्यांनी सहकार्य न केल्याचा मुद्दा त्यांनी मुंबई काँग्रेसचे तल्कालिन अध्यक्षांकडे केली होती. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने मातोंडकर नाराज होत्या.

उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मिलिंद देवरा आणि संजय निरूपम या मुंबई काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी ट्विटरवरून एकमेकांवर नाव न घेता टीका केली होती. मुंबई काँग्रेसमधील हे शीतयुद्ध आता दिल्लीतही पोहोचले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यांची दखल घेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी बुधवारी दिल्लीला बोलावले आहे. उर्मिला मातोंडकर आणि कृपासिंह राजीनाम्याबरोबरच मुंबई काँग्रेसमधील वादावर सोनिया गांधी गायकवाड यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.