स्त्री-भ्रूणहत्येला केवळ सोनोग्राफी करणारे डॉक्टर जबाबदार असल्याचे गृहीत धरून देशभरातील सोनोग्राफी डॉक्टरांची महापालिका व शासनाच्या अधिकाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणात छळवणूकीविरोधात सोनोग्राफी स्त्रीरोग तज्ज्ञ बुधवारी देशव्यापी बंद पाळणार आहेत.
केवळ अर्ज भरण्यात चूक झाली तरीही गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत गुन्हे नोंदविले जात असल्याचा आरोप करीत, या छळणुकीच्या विरोधात सोनोग्राफी करणाऱ्या स्त्री-रोगतज्ज्ञ डॉक्टरांनी उद्या एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ३५ हजारांहून अधिक डॉक्टर या बंदमध्ये सामील होणार असून आझाद मैदानावर मोर्चाही काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात मुलींचे जन्मप्रमाण वेगाने घसरत असून ग्रामीण भागासह सुशिक्षित समाजातही मुलगी नको म्हणून मोठय़ा प्रमाणात गर्भपात केले जातात. याविरोधात केंद्र शासनाने केलेल्या ‘पासीपीएनडीटी’ कायद्यांतर्गत सोनोग्रीफीद्वारे लिंगचिकित्सा करणाऱ्या डॉक्टरांविरोधात मोठय़ा प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात शासन व पालिकेने सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना किचकट माहिती सादर करणारे फॉर्म भरणे सक्तीचे केले. यात काही किरकोळ त्रुटी असल्या तरीही पालिका व शासनाचे अधिकारी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करू लागले. वृद्ध तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी उपयुक्त असणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफीवर बंदी घालण्यात आली, सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना दोनपेक्षा जास्त ठिकाणी व्यवसाय करण्यास बंदी लागू करण्यासाठी अनेक जाचक अटी लागू करण्यात आल्या. ‘आयएमए’चे डॉ. उत्तुरे यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डॉक्टरांवर केवळ गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावर व्यवसायबंदी लागू करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर दबाव येऊ लागले. डॉक्टरांच्या संघटनेने स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाईचे समर्थन केले असून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची छळवणूक थांबवावी, अशी मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.

‘नियम तयार करणार’
डॉक्टरांच्या संघटनेशी माझी यापूर्वी चर्चा झाली असून येत्या १६ एप्रिल रोजी विशेष बैठक आयोजित केली आहे. सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांचे अर्ज भरण्यात तांत्रिक चूक झाल्यास डॉक्टरांची जी छळवणूक होते ते चुकीचे असून पोर्टेबल सोनोग्राफी वापरू देण्याबाबत काही नियम करून मान्यता देण्याचा विचार सुरू आहे. अर्ज प्रक्रिया सुटसुटीत करण्याचे कामही सुरू असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.