आयकर विभागाकडून सलग तिसऱ्या दिवशी अभिनेता सोनू सूदच्या घराच्या परिसराची तपासणी केली जात आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्याप्रमाणात करचोरीचे पुरावे आढळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चित्रपटांमधून मिळालेला पैसा आणि खासगी गुंतवणुकीसंदर्भात करचोरी करण्यात आल्याचे पुरावे हाती लागल्याचं सांगण्यात येत आहे. सूद चॅरिटी फाऊण्डेशनची खाती आणि आर्थिक व्यवहारही तपासेल जाणार आहे. आज सायंकाळी आयकर विभागाकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यात व्यक्त केली जातेय.

मागील तीन दिवसांपासून सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी तपास करत आहेत. सोनू सूदचा अकाऊंटंट हा शहरामध्ये नसल्याने त्याला आयकर विभागाला तातडीने माहिती देता आली नसल्याचं समजतं. बुधवारीच सोनूच्या घरी आयकर विभागाने तपास सुरु केलाय. सोनूशीसंबंधित सहा ठिकाणांवर आयकर विभागाने तपास केला असून ही ठिकाणं मुंबई आणि लखनऊमध्ये आहेत. आयकर विभागाकडून तपास केला जात असला तरी ही धाडी टाकण्यासारखी कारवाई नसून कागदोपत्री पडताळणी केली जात आहे. सोनू सूदने करचोरी केल्यासंदर्भात हा तपास केला जात असल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. सोनूने एका संपत्तीसंदर्भात केलेल्या व्यवहाराचीही तपासणी आयकर विभागाकडून केली जात असल्याचं न्यूजद १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

यापूर्वीही सोनू सूद कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकला होता. मुंबई महानगरपालिकेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलेली. जुहूमधील आपल्या सहा मजली घरामध्येच सोनूने परवानग्यांची पूर्तता न करता हॉटेल सुरु केल्याचा आरोप करण्यात आलेला. सोनू सूदने या प्रकरणामध्ये बीसीएमसीने पाठवलेल्या नोटीस विरोधात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळून लावल्यानंतर सोनूने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.  सोनू सूद आणि लखनऊ बेस्ट रिअल इस्टेट फर्म यांच्यात झालेला कराराबाबत आयकर विभाग तपास करत आहे. या करारात करचुकवेगिरीच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तपासाला ‘सर्वे’ म्हटले जात आहे. याशिवाय, सोनू सूदबाबत सुरु असलेल्या तपासाला राजकीय रंगही दिला जात आहे. अलीकडे सोनू सूद दिल्ली सरकारच्या एका प्रकल्पाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे.

सर्वात प्रथम बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या कार्यालयात पोहोचले होते.  त्याच्या कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे वा अन्य गोष्टी अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नाहीत. सोनू सूदशी संबंधित अन्य सहा कंपन्यांचीही विभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. सोनू सूदवर सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई ही राजकीय सूडबुध्दीने केली जात असल्याची चर्चा मात्र समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.