व्यायामशाळा आणि मॉल सुरू करण्याची मागणी मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे. सर्वबाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र, मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा (लोकल) सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिथिलीकरणाच्या टप्प्यात पुन्हा टाळेबंदी होऊ नये असाच प्रयत्न आहे. जास्तीत जास्त गोष्टी कशा सुरू होतील यासाठी नियम-निकष ठरवण्याचा सरकारचा विचार आहे. आरोग्याशी संबंधित असल्याने व्यायामशाळा सुरू कराव्यात, सर्व अटी पाळून मॉलमधील दुकानांनाही परवानी द्यावी अशी मागणी होत असून सरकार त्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. सर्वबाजूंनी विचार करून त्याबाबत निर्णय होईल. या गोष्टी सुरू करायच्या झाल्यास त्याबाबत नियम-अटी काय असाव्यात हे ठरवले जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

नालासोपारा येथील प्रवाशांचा उद्रेक लक्षात घेऊन लोकलसेवा सुरू करणार का असे विचारले असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.