नरिमन पॉइंटहून ठाण्याला जाणाऱ्यांसाठी परिवहन विभागाने नरिमन पॉइंट ते ठाणे हा नवीन शेअर टॅक्सीचा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर संध्याकाळी टॅक्सी चालवण्यात येणार असून साध्या टॅक्सीसाठी माणशी १६१ रुपये तर वातानुकूलित टॅक्सीसाठी २०१ रुपये लागतील. या मार्गावर बेस्टची एसी बससेवा आधीच चालू असून शेअर टॅक्सीमुळे या सेवेपुढे आव्हान उभे राहणार आहे.
ठाण्यातील अनेक लोक मंत्रालय परिसरात कामानिमित्त रोज येतात. यापैकी अनेक जण चांगल्या कंपन्यांमध्यो मोठय़ा हुद्दय़ावर आहेत. त्यामुळे त्यांचा विचार करून ही शेअर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडंट जवळून या टॅक्सी सुटणार आहेत. साधारणपणे ३५-३६ किलोमीटरच्या या अंतरासाठी ४८५ रुपये लागतात. मात्र शेअर टॅक्सीमध्ये प्रत्येक प्रवाशाला १६१ रुपये द्यावे लागतील. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचे सव्वातीनशे रुपये वाचतील. तर टॅक्सी चालकालाही प्रत्येक फेरीमागे किमान दीडशे रुपये जास्त मिळतील. वातानुकूलित टॅक्सीच्या एका फेरीसाठी ६०५ रुपये होतात. मात्र शेअर टॅक्सीच्या प्रत्येक प्रवाशाकडून २०१ रुपये घेतल्याने प्रवाशांना साडेचारशे ते पाचशे रुपयांचा फायदा होणार आहे. तर टॅक्सीचालकांना प्रत्येक फेरीमागे दोनशे रुपये जास्त मिळतील.
या योजनेला परिवहन विभागाची मान्यता मिळाली आहे. या नव्या शेअर मार्गामुळे बेस्टच्या ‘कॅडबरी-बॅकबे आगार’ या सेवेला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. या सेवेचे तिकीट कमी असले, तरी ही बस अनेक थांब्यांवर थांबत जात असल्याने प्रवासी शेअर टॅक्सीचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे.