करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेले उपनगरीय रेल्वेचे दरवाजे लवकरच उघडणार आहेत. महानगर प्रदेशातील करोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर रेल्वे प्रवासाची सर्वाना मुभा देण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली.

टाळेबंदी शिथिलीकरणांर्तगत टप्प्याटप्प्याने उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी महिलांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी दिल्यानंतर आता सर्वासाठी रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार बुधवारी विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. उपनगरीय रेल्वे सेवा सर्वाना खुली करण्यावर सविस्तर चर्चा झाली. त्या वेळी करोनाच्या परिस्थितीत टप्प्याटप्प्याने लोकांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली.

आजच्या बैठकीत सर्वाची मते, सूचना जाणून घेतल्या. सर्वसामान्यांसाठी लोकल के व्हा सुरू करता येईल याबाबतही सविस्तर चर्चा झाली. मात्र लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

सध्या विविध श्रेणींना प्रवास परवानगी देताना प्रवाशांच्या मागणीचा विचार करण्यात येतो. त्यानुसार लोकल फेऱ्या हळूहळू वाढविण्यात येत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

फेऱ्या वाढणार?

आजच्या बैठकीत कार्यालयीन वेळा बदलण्याविषयी चर्चा झाली. शिवाय सध्या एका लोकलमधून ७०० प्रवाशांना प्रवास परवानगी देण्याचा नियम आहे, जर पश्चिम रेल्वेने सध्या दिवसभरात असलेल्या ७०६ फेऱ्या वाढवून त्या १३०० पर्यंत नेल्या, तर दररोज १० लाखांपर्यंतच प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे प्रवासी क्षमतेचा विचार करून लोकलच्या फे ऱ्या वाढविण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.