‘आवाज फाऊंडेशन’चे निरीक्षण

हवेच्या प्रदूषणामुळे यंदाच्या दिवाळीत मुंबईकरांचा श्वास कोंडलेला असतानाच  दिवाळीदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे निरीक्षण ‘आवाज फाऊंडेशन’ने केले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘आवाज फाऊंडेशन’तर्फे मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी ध्वनी पातळीची मोजणी करण्यात आली होती. यावेळी मरिन ड्राइव्ह येथे मध्यरात्री ११७.८ डेसिबल एवढी आवाजाची पातळी नोंदवली गेली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत  वाढलेली आहे. याशिवाय रात्री १० वाजल्यानंतरही फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजात वाढ झाल्याचे निरीक्षणही यावेळी नोंदविण्यात आले आहे.

ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाच्या पातळीच्या काही मर्यादा आहेत. त्यामध्येही दिवसा आणि रात्री आवाजाची पातळी केवढय़ा डेसिबलपर्यंत असावी, याच्याही मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ डीबी व रात्री ७० डीबी, विपणन क्षेत्रात दिवसा ६५-रात्री ५५, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५, रात्री ४५ तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबलपर्यंत आवाजाची पातळी मर्यादित असणे बंधनकारक आहे.

सणांच्या दिवशी वेळेची मर्यादा शिथिल करून रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र दिवाळीत ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी रात्री १२ पर्यंत असली तरी फटाके फोडण्याची मर्यादा रात्री १० पर्यंतची कायम ठेवण्यात आली होती. असे असूनही मुंबईतील काही ठिकाणी रात्री १० वाजल्यानंतर फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजात गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाल्याचे निरीक्षण ‘आवाज फाऊंडेशन’ने केले आहे. याशिवाय एकूणच दिवाळीदरम्यान होणाऱ्या आवाजात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. फाऊंडेशनतर्फे मुंबईतील जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे तलाव व मरिन ड्राइव्ह याठिकाणी गुरुवारी ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात आली होती. त्यानुसार मरिन ड्राइव्ह येथे गुरुवारी रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान आवाजाची पातळी ११७.८ डीबीपर्यंत नोंदविण्यात आली.

गेल्या वर्षी मुंबईतील सर्वसाधारण आवाजाची पातळी ११३ डीबी एवढी नोंदविण्यात आली होती. शिवाय २०१३ साली १२४ डीबी व २०१५ साली १२३.१ डीबी पातळी नोंदविण्यात आली होती. मरिन ड्राइव्ह येथे रात्री १० नंतर मोठा आवाज करणारे फटाके फोडले गेल्याने याठिकाणी आवाजाची पातळी १०० डीबीपेक्षाही वाढल्याचे निरीक्षणात आल्याचे, आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दुलाली यांनी स्पष्ट केले.