News Flash

शोभायात्रा, सत्यनारायणावरही ध्वनिमर्यादा

ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याबाबतचे आमचे आदेश सर्वच सण आणि अन्य धार्मिक मिरवणुकांसाठीही लागू आहेत.

उच्च न्यायालयाचा आवाजी उन्मादाला चाप; सगळेच उत्सव कारवाईच्या मर्यादेत
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीतील ध्वनिप्रदूषणच नव्हे, तर गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणाऱ्या स्वागतयात्रा, सत्यनारायणादरम्यान होणारे विविध कार्यक्रम आणि अन्य मिरवणुकांमधील आवाजाची पातळीही यापुढे मोजली जाणार आहे. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आपले आदेश केवळ तीन सणांपुरतेच मर्यादित नाहीत, तर ते या सगळ्यांनाही लागू आहेत, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केल्याने उत्सवी उन्मादाला आळा बसण्याची सुचिन्हे आहेत.
गणेशोत्सवात राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे बेकायदा मंडप उभारले गेले आणि ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन झाले. त्यामुळे नवरात्रोत्सव व दिवाळीत दक्ष राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावर नवरात्रोत्सव आणि दिवाळीत ध्वनिप्रदूषण झालेच नाही, असा अविश्वसनीय दावा सरकारने केला. प्रत्यक्षात ध्वनिप्रदूषण झाले की नाही हे मोजण्याची जबाबदारी असलेल्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन्ही सणांदरम्यान आवाजाची पातळी मोजलीच नाही, हे मंगळवारच्या सुनावणीत खुद्द पोलीस अधिकाऱ्यांनीच उघड केले.
मुंबई व ठाण्यातील किरकोळ आकडेवारी वगळता अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये ध्वनिप्रदूषण झाल्याची एकही तक्रारच नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा आमचे आदेश धाब्यावर बसवलेले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर अवमान कारवाई का करू नये, अशी विचारणा करीत आमच्या आदेशांचे पालन नेमके कधी करणार, असा खोचक सवाल न्या. अभय ओक आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने केला.

पाच पोलीस ठाण्यांमागे एकच उपकरण!
नवरात्रोत्सव व दिवाळीत ध्वनिप्रदूषण झाले
की नाही याची पाहणी करण्यात पोलीस का अपयशी ठरले, यामागील अडचणींचा पाढा सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयात वाचला. मुंबईवगळता अन्य ठिकाणी पाच पोलीस ठाण्यांसाठी आवाजाची पातळी मोजणारे एकच उपकरण असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने नेमकी किती उपकरणे आवश्यक आहेत, याची माहिती देण्याचे आदेश दिले.

ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याबाबतचे आमचे आदेश सर्वच सण आणि अन्य धार्मिक मिरवणुकांसाठीही लागू आहेत. या मिरवणुकांसाठीही पोलिसांकडून परवानगी घेण्यात येते. त्यामुळे त्यात होणारे ध्वनिप्रदूषण मोजून आयोजकांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. जोपर्यंत फौजदारी कारवाई होत नाही, तोपर्यंत या सगळ्याला आळा बसणार नाही.
– उच्च न्यायालय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 6:27 am

Web Title: sound restriction on pageant satyanarayan puja
Next Stories
1 काशिमीरा येथे अल्पवयीन मुलीवर निकटवर्तीयाकडून लैंगिक अत्याचार
2 ‘मिलीबग’ कीटकांपासून मरणाऱ्या झाडांसाठी तातडीने उपाययोजना करा!
3 महागडय़ा सौरपंप खरेदीत गरव्यवहार?
Just Now!
X