मुंबईत राहत्या जागेचा पर्याय शोधून काढणं हे महाकठीण काम! अशात अनेक मुलं किंवा मुली पेइंग गेस्टचा पर्याय शोधून काढतात. भाडे तत्त्वावर घर घेण्यापेक्षा हा पर्याय सोपा असतो. मात्र ज्या मुली पेइंग गेस्ट म्हणून मुंबईत राहात आहेत किंवा राहू इच्छितात त्यांना सावध करणारी एक बातमी समोर आली आहे. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या मुलींचे चोरून चित्रीकरण करणाऱ्या घरमालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा घरमालक दक्षिण मुंबईत राहणारा आहे. त्याच्या घरी तीन मुली पेइंग गेस्ट म्हणून राहात होत्या. या तीन मुलींचे छुप्या कॅमेराने चित्रीकरण केल्याच्या आरोपावरून या घरमालकाला अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या घरमालकाचा दक्षिण मुंबईत चार बेडरुमचा फ्लॅट आहे. हा आरोपी त्याच्या आई वडिलांसह राहतो. तो अविवाहित आहे. त्याचे आई वडील वृद्ध आहेत. पोलिसांनी त्याच्या मोबाइल अॅडप्टरमधला कॅमेरा शोधून काढला आणि तो अॅडप्टर जप्त केला आहे. या घरमालकाने तीन मुलींना पेइंग गेस्ट म्हणून ठेवले. त्यानंतर त्याने अॅडप्टरमध्ये असलेल्या कॅमेराद्वारे या मुलींचे संभाषण आणि चित्रीकरण रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हे सगळे जप्त केले आहे.

सुरुवातीला सगळे काही सुरळीत सुरु होते. त्यानंतर हा घरमालक या मुली आपसात जे बोलत होत्या तसेच बोलू लागला. त्यानंतर या मुलींना वाटले की हा चोरून आपले संभाषण ऐकत असावा. त्यामुळे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. पण या तीनपैकी एका मुलीला हा अॅडप्टर सापडला. तिला याबाबत संशय आल्याने तिने या अॅडप्टरवर कपडा टाकला. ज्यानंतर तातडीने घरमालक त्यांच्या खोलीत आला आणि अॅडप्टरवर कपडा कोणी टाकला याची विचारणा केली.

घरमालकाने या मुलींना तो अॅडप्टर नसून अँटेना बूस्टर असल्याचे सांगितले होते. मुलींनीही त्यावर विश्वास ठेवला होता. मात्र जेव्हा त्यांना संशय आला तेव्हा त्यांनी अॅडप्टरचा फोटो घेतला आणि तो गुगलवर सर्च केला तेव्हा तो अॅडप्टर किंवा अँटेना बूस्टर नसून एक छुपा कॅमेरा असल्याचे या मुलींना समजले. या मुलींनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या मुलींची तक्रार नोंदवून घेतली आणि त्यानंतर या घरमालकाला अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याप्रकरणी आता घरमालकाची चौकशी सुरु आहे. त्याने याआधी किती मुलींचे अशा प्रकारे चित्रीकरण केले हेदेखील त्याला विचारण्यात येते आहे असेही पोलिसांनी स्पष्ट केले.