शिवसेनानेते मनोहर जोशी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक  लढविण्यास  इच्छुक असतानाच महायुतीचे घटक असलेल्या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘इच्छा कोणीही व्यक्त करू शकतो, परंतु तिकीट उद्धव ठाकरेच जाहीर करतील’ असे सांगून जोशी यांना ‘खो’ देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात जोशी यांना उमेदवारी मिळाली तरी मतदारसंघाची रचना आणि मतांचे गणित लक्षात घेता दक्षिण मध्य मुंबईचा किल्ला ‘सर’ करणे महायुतीसाठी अवघड ठरणार आहे.
महायुतीत मनसे येणार या गृहितकावर अनेकांचे आडाखे ठरलेले आहे. शेवटच्या क्षणी भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीतून मनसे लोकसभा निवडणुकीत महायुतीत सामील होईल, अशी अटकळ सेना-भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महायुतीत मनसे सामील झाली तरीही दक्षिण मध्यचा बालेकिल्ला सर करता येणार नाही, असा विश्वास काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला. या लोकसभा मतदारसंघातील वडाळा, चेंबूर, अणुशक्ती नगर, शीव, धारावी आणि माहीम या विधानसभा मतदारसंघापैकी माहीमचा किल्ला सध्या मनसेच्या ताब्यात आहे तर उर्वरित सर्व भाग काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असून लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत या सर्व मतदारसंघात युती काँग्रेसपेक्षा सत्तर हजार मतांनी पिछाडीवर आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांना दोन लाख ५७ हजार मते मिळाली तर सेनेच्या सुरेश गंभीर यांना एक लाख ८१ हजार मते मिळाली होती. त्यावेळी मनसेच्या उमेदवार श्वेता परूळकर यांना एक लाख आठ हजार मते मिळाल्यामुळे मनसे महायुतीत आल्यास जागा मिळू शकते अशी अटकळ सेनेच्या नेत्यांना वाटते. त्यातच महापालिकेच्या २०१२च्या निवडणुकीत सेना-भाजपला दोन लाख १४ हजार आणि मनसेला एक लाख १ लाख ४१ हजार मते मिळाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला दोन लाख सात हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. या बदलत्या आकडेवारीचा विचार करून मनोहर जोशी पुन्हा एकदा या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत.