मुंबईतील विशेषत: दक्षिण मुंबईतील ५० टक्के शाळांनी डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी शाळेत डबे आणून देण्यापासून रोखले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे शाळा प्रशासनांचे म्हणणे असले तरी पालकांमध्ये या निर्णयावरुन नाराजी दिसून येते. मात्र, याबाबत पालकांनी उघडपणे भाष्य करण्यास नकार दिला आहे.

नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर या संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांनी सांगितले की, शहरातील ५० टक्के शाळांनी मुख्यत: कॉन्व्हेंट शाळांनी डबेवाल्यांना प्रवेशबंदी केली आहे. पूर्वी आम्ही १ लाख डबे पुरवायचो. पण आता हा आकडा २० हजारांवर घसरला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई डबेवाला संघटनेचे सुभाष तळेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून शाळांच्या या कृतीचा निषेध केला आहे. ‘एकीकडे शाळांमध्ये जंक फूडवर बंदी टाकली जाते आणि दुसरीकडे शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना घरात तयार केलेले आरोग्यदायी खाद्यपदार्थ खाण्यापासून रोखत आहे. शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना शाळेतील कँटिनमधून खाद्यपदार्थ विकत घेण्यास भाग पाडत आहे. यापूर्वी शाळांनी गणवेश, पुस्तकं याबाबतही असाच प्रकार केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मेडगे आणि तळेकर या दोघांनाही या निर्णयामागे कँटिन चालवणाऱ्या ठेकेदारांचा हात असल्याचे वाटते.  मुख्याध्यापकांना नफ्यातील हिस्सा देऊन ठेकेदार हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडत असावेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

गिरगाव येथील सेंट तेरेसा या कॉन्व्हेंट शाळेचे मुख्याध्यापक फादर अँथनी यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. कॉन्व्हेंट शाळांनी शाळेचे तास कमी केले आहे. सकाळच्या सत्रात फक्त पाच तास शाळा भरते. त्यामुळे दुपारी जेवणाच्या वेळी विद्यार्थी घरी पोहोचलेले असतात. तर जी डी सोमानी शाळेच्या मुख्याध्यापकांनीही हे आरोप फेटाळून लावले आहे “आम्ही शाळेत डबेवाल्यांच्या सुविधेला कधीही प्रोत्साहन दिले नाही. यामागे सुरक्षा हे महत्त्वाचे कारण आहे. डबा शाळेत येईपर्यंत त्यातील खाद्यपदार्थात काय होईल, हे सांगता येणार नाही. तसेच डबा घेऊन येणाऱ्या व्यक्तींना शाळेच्या आवारात प्रवेश देऊन सुरक्षा नियमांचे उल्लंघन होऊ शकते. पालकांनीही या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आम्ही मुलांवर कोणतीही सक्ती केलेली नाही. मुलांना घरुन डबा घेऊन येण्यास परवानगी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.