दक्षिण मुंबईतील व्यावसायिकाच्या दक्षतेमुळे नशेच्या व्यसनातून मुलाची सुटका

आपल्या मुलाच्या वागण्यातील बदलाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याच्यावर पाळत ठेवून तो अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे शोधून काढत त्याला पुरवठा करणाऱ्या तस्करांच्या हाती पोलिसांच्या बेडय़ा पडण्यासाठी पाठपुरावा करत मुंबईतील एका व्यावसायिकाने अन्य पालकांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या मुलांना फैलावर घेऊन त्यांचे आणखी मानसिक खच्चीकरण करण्याऐवजी या व्यावसायिकाने मुलाला वाईट मार्गाला लावणाऱ्याशी चार हात केले. त्याचा हाच आदर्श आता अन्य पालकांनी घेतला असून अनेक जण आपल्या मुलांनाही अमली पदार्थाच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलिसांची मदत घेत आहे.

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या या व्यावसायिकाला आपल्या तेरावीत शिकणाऱ्या मुलाच्या स्वभावात अचानक बदल झाल्याचे लक्षात आले. आधी शांत, सहज चारचौघांत मिसळणारा आणि कुटुंबाला जास्त वेळ देणारा आपला मुलगा अभ्यास व छंद सोडून अचानक घरात एकलकोंडय़ासारखे राहू लागल्याचे त्याने पाहिले. त्याच्यासोबत नवीन मित्र दिसू लागले. त्याचे जेवणाचे प्रमाण कमी झाले. हे सगळे पाहिल्यानंतर आपला मुलगा वाईट मार्गाला तर जात नाही ना, या चिंतेने त्याला घोर लावला. महिनाभर पाळत ठेवल्यानंतर आपला मुलगा ‘एमडी’ या अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे या पित्याच्या लक्षात आले. मग त्याने त्याला ‘एमडी’ पुरवणाऱ्याचा पाठलाग सुरू केला. हा ‘एमडी’ विक्रेता महाविद्यालयीन तरुणांनाच विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर या पित्याने एक निनावी अर्ज करून ही हकीकत मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यापर्यंत पोहोचवली. पडसलगीकर यांनीही तातडीने अमली पदार्थ विरोधी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर दोन आठवडय़ांत अब्दुल गनी ऊर्फ पापा बकरी या सराईत अमली पदार्थ विक्रेत्याला बेडय़ा ठोकल्या.

हाच कल मुंबईतील अनेक पालकांमध्ये दिसत असल्याचे अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘आमच्याकडे अनेक पालक या कारणांसाठी येत असतात. काहींना मुले अमली पदार्थाच्या आहारी गेल्याचे लक्षात आलेले असते. काहींना केवळ शंका असते. मात्र मुलांवर अशी वेळ आणणाऱ्या तस्कर वा विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी हे पालक आमच्याकडे येतात. पालक वर्गातला  हा सकारात्मक बदल गेल्या काही दिवसांपासून जाणवतो आहे. खबऱ्यांसोबतच  मुंबईकरांकडूनही मोठय़ा प्रमाणात माहिती देणारे फोन येत आहेत,’ असे अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त  शिवदीप लांडे यांनी सांगितले.

[jwplayer Rsyrg51Y]

२७ तरुण ड्रग्जच्या विळख्याबाहेर

गेल्या सहा महिन्यांमध्ये शहरातले २७ युवक अमली पदार्थाच्या व्यसनातून पूर्णपणे बाहेर काढण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. याआधी अटक झालेल्या युवकांवर फक्तकारवाईच होत होती. मात्र आता या मुलांना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. सरकारी व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये युवकांना धाडणे किती महत्त्वाचे आहे हे पालकांना पटवून दिले जात आहे. या २७ युवकांपैकी दोन युवकांची परिस्थिती वाईट होती. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र तरीही सतत पाठपुरावा करून त्यांनाही विळख्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

गेल्याच आठवडय़ात एकाने फोन करून एका घरात गांजाची शेती होते, अशी माहिती दिली. अधिकारी तिथे गेले. घरात बरीच झाडे होती पण ती गांजाची नव्हती. माहिती चुकीची होती यापेक्षा ती व्यक्ती सतर्क होती, तिला विभागात माहिती द्यावीशी वाटली हाच सकारात्मक बदल महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांकडून, पालकांकडून मिळणाऱ्या माहितीआधारे कारवाया केल्या जात आहेत.

–  शिवदीप लांडे, उपायुक्त, अमली पदार्थ विरोधी पथक