मूल होत नसल्याने दक्षिण मुंबईतील दाम्पत्याने १० दिवसांच्या मुलाला नांदेडहून आणून आपलेसे केले. गेले २० महिने कुठलेही विघ्न आड न आलेल्या या दाम्पत्याची तक्रार त्यांना मूल विकत घेण्यासाठी पैसे देणाऱ्या नातेवाईकांनी केल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे. त्यांनीच या व्यवहाराची तक्रार पोलिसांना निनावी पत्र देऊन केल्याचेही स्पष्ट होत आहे. पालकांची रवानगी तुरुंगात झाल्याने न्यायालयाने मुलाला संगोपनासाठी स्वयंसेवी संस्थेत ठेवलेआहे. दरम्यान, मूल विकणारी संस्थाचालक आपण हे एकमेव मूल विकल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
मार्च २०१६ मध्ये आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना आलेल्या निनावी अर्जात एका दाम्पत्याने नांदेडहून १.८० लाख रुपयांना मूल विकत आणल्याची तक्रार केली होती. त्यानुसार समाजसेवा शाखेने या प्रकाराची तक्रार ताडदेव पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी नांदेडमधील सुनिता या बालगृहाची संचालक सत्यश्री गुट्टे हिला अटक केली. परंतु, निनावी पत्र कोणी लिहीले याचे गूढ कायम होते. पोलिसांच्या तपासात हे पत्र दाम्पत्यातील पतीच्या बहिणीनेच केली असावी, असे स्पष्ट होत आहे.