मुंबई : वरळी, ग्रॅन्टरोड, भायखळा आणि आजूबाजूच्या परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दक्षिण मुंबई परिसर करोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील बनला असून कुलाब्यापासून परळपर्यंतच्या टप्प्यात सुमारे २५७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेने या परिसरातील घराघरात जाऊन तपासणी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ५८९ वर पोहोचली असून पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत शहर भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या ३०७ वर पोहोचली असून त्यापैकी २५७ रुग्ण दक्षिण मुंबईतील ग्रॅन्टरोड, भायखळा, वरळी, परळ भागात सापडले आहेत.

दक्षिण मुंबईच्या एका टोकाला असलेल्या जी-दक्षिण विभागातील वरळी, जिजामाता नगर, परळ परिसरात सर्वाधिक म्हणजे १३३, तर त्या खालोखाल ई विभाग कार्यालयाच्या हद्दीतील भायखळा आणि आसपासच्या परिसरात ५९ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर डी विभाग कार्यालयाचा क्रमांक लागत असून या विभागाच्या हद्दीत ग्रॅन्टरोड, नाना चौक, ताडदेव, वाळकेश्वर परिसरात सुमारे ४७ रुग्ण आढळले आहेत. तसेच ए, बी आणि सी विभाग कार्यालयांच्या हद्दीत अनुक्रमे सहा, पाच आणि सात रुग्ण आढळून आले आहेत.  शहर आणि पश्चिम उपनगरांच्या वेशीवर असलेल्या एच-पूर्व आणि एच-पश्चिम परिसरात अनुक्रमे ३३ आणि १७ रुग्ण सापडले आहेत.

पश्चिम उपनगरांमध्ये १८८ रुग्ण आढळले असून पश्चिम उपनगरांमध्ये के-पश्चिम भागात म्हणजे अंधेरी, विलेपार्ले पश्चिम भागात सर्वाधिक ३४ रुग्ण आहेत. तर पूर्व उपनगरांमधील रुग्णसंख्या ९८ वर पोहोचली असून गोवंडी, चेंबूर भागात सर्वाधिक २३ रुग्ण सापडले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South mumbai extremely sensitive after coronavirus positive patients increase zws
First published on: 09-04-2020 at 03:12 IST