मुंबई : विविध अवकाश मोहिमांची माहिती देणारे आणि ग्रहताऱ्यांविषयीची कोडी उलगडून दाखवणारे लघुपट पाहण्याची संधी मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे. वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात शुक्रवारपासून ‘नॅशनल जिओग्रॅफिक’चा लघुपट महोत्सव सुरू झाला आहे. त्याची सांगता २७ फेब्रुवारीला होणार असून तो सर्वासाठी खुला असणार आहे.

अवकाशयान म्हणजे काय, ते सोडण्याची पूर्वतयारी, अवकाशातील दृश्ये याविषयी सर्वानाच कुतूलह असते. पृथ्वीपासून अंतराळापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखविणाऱ्या उत्कृष्ट लघुपटांची निर्मिती नॅशनल जिओग्राफीने केली आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त या लघुपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी ‘मिशन टू द सन’ या लघुपटाने झाली. सूर्य आणि सूर्यप्रकाश यामागचे विज्ञान जाणून घेण्यासाठी प्रथमच नासाकडून अंतराळात सोडण्यात येणाऱ्या अवकाशयानाचा प्रवास या लघुपटातून उलगडण्यात आला आहे. हे सर्वात वेगवान अवकाशयान असणार आहे. ते ४ लाख ५० हजार मैल प्रतितास वेगाने प्रवास करील. सूर्याला स्पर्श करण्याच्या मानवाच्या या पहिल्याच प्रयत्नाची माहिती या लघुपटातून देण्यात आली.

पुढील पाच दिवस सकाळी १० ते ११ आणि ११ ते १२ या दोन वेळांत चित्रपट दाखविले जाणार आहेत. ताऱ्यांची आणि ग्रहांची निर्मिती शोधून काढणाऱ्या जगप्रसिद्ध अशा हबल दुर्बिणीची महती ‘हबल्स अमेझिंग युनिव्‍‌र्हस’ या लघुपटातून देण्यात येणार आहे. अवकाशयाने अंतराळात कुठे थांबतात, त्यांचे नियंत्रण कसे केले जाते, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कसे असते हे ‘आयएसएस २४/७ ऑन स्पेस स्टेशन’ या लघुपटातून सोमवारी (२५ फेब्रुवारी) दाखवले जाईल. १६ देशांनी मिळून घडविलेल्या या स्थानकावर सर्व देशांतील अंतराळवीर कसे राहतात, काय खातात, इथपासून ते श्वास कसा घेतात इथपर्यंत सारे काही या जाणून घेता येईल.

मंगळ ग्रहाबाबत जाणून घेण्यासाठी २० वर्षांपासून करण्यात आलेल्या विविध प्रयत्नांचा आढावा, मंगळयानावरील छायाचित्रे, निरीक्षणे याची माहिती ‘क्युरिऑसिटी : लाइफ ऑफ अ मार्स रोव्हर’ या लघुपटातून २६ फेब्रुवारीला घेता येईल. भारताने केलेल्या मंगळस्वारीचा प्रवास त्यावेळेच्या दृश्यांसह पाहण्याची संधी २७ फेब्रुवारीला ‘मंगळयान : इंडियाज् मिशन टू मार्स’मुळे मिळेल.