विधान परिषदेच्या इतिहासात सभापती, उपसभापती व विरोधी पक्षनेते एकाच वेळी निवृत्त होत आहेत.
या सर्वाना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप देण्यात आला. पुन्हा निवडून येण्याच्या सर्वानाच शुभेच्छाही देण्यात आल्या.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्याने निवृत्त होणारे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह शोभाताई भडणवीस, दीप्ती चवधरी, प्रकाश बिनसाळे, मुझ्झफर हुसेन, विनायक मेटे व विजय सावंत यांना निरोप देण्यात आला.
निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या सभागृहातील उत्तम कामगिरीचे कौतुक करतानाच सभागृहात त्यांचे पुनरागमन होईल, अशी आशा सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली. विधानसभा सदस्यांमधून व स्थानिक संस्था प्राधिकरण मतदारसंघातून निवडून आलेल्या या अकरा सदस्यांची जूनमध्ये मुदत संपत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणात विधान परिषदेतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे हमखास निवडून येणाऱ्यांमध्ये कुणाची वर्णी लागणार, याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.