नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रातील (नयना) अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सिडको लवकरच विशेष पथक तयार करणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आल्याने अनधिकृत बांधकाम माफियांनी आपला मोर्चा सध्या रायगड जिल्ह्य़ातील नयना क्षेत्राकडे वळविला आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित क्षेत्रांत (६०० चौ.कि.मी.) अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. यासाठी बांधकामाचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. स्वस्त घरे मिळत असल्याने सर्वसामान्यांचा ही घरे घेण्याकडे कल वाढला आहे.
सरकारने या क्षेत्राची जबाबदारी आणि नियोजन सिडकोवर सोपविले आहे. त्यामुळे या भागात आता अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची खबरदारी घेणे सिडकोला क्रमप्राप्त आहे. त्यानुसार सिडकोने या भागाचे सर्वेक्षण सुरू केले असून, नियोजन आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या भागातील जमिनीचे मालक हे स्थानिक असल्याने त्यांनी बांधकाम करण्यास कोणतीही हरकत नाही, पण हे बांधकाम सिडकोची परवानगी घेऊन केले पाहिजे, असे मत भाटिया यांनी व्यक्त केले. या क्षेत्रासाठी एक सिस्टीम तयार केली जात आहे. अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी सिडको विशेष पथक तयार करणार असल्याचे भाटियांनी सांगितले.