* रिलायन्स एनर्जीतर्फे विशेष उपक्रम
* विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धेचे आयोजन
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ऊर्जेची होणारी निर्मिती व तिचा होणारा वापर यांच्यात असणारी तफावत पाहता मर्यादित ऊर्जास्रोतांपासून तयार केल्या जाणाऱ्या विजेचा योग्य वापर व तिचे संवर्धन करण्याविषयी शालेय विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स एनर्जीतर्फे ‘यंग एनर्जी सेव्हर्स’ हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांसाठी नाटिका सादरीकरण या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. जेमिनी पाठक यांनी घेतलेल्या या कार्यशाळेत मुंबईतील २५ शाळांमधील ९ ते १२ या वयोगटातील सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून निवडलेल्या आठ शाळांमधील विद्यार्थ्यांनी मालाड येथे झालेल्या स्पर्धेत नाटिका सादर केल्या.
अभिनेते सचिन पिळगावकर व अभिनेत्री रत्ना पाठक-शहा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. ‘ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज असून शालेय वयातच मुलांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
रिलायन्स एनर्जीकडून गेल्या सात वर्षांपासून याबाबतीत होत असलेल्या प्रयत्नांमुळे शालेय मुलांमध्ये याविषयी जागृती होत आहे. भावी पिढय़ांसाठी विजेची बचत करुन ऊर्जा संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे,’ असे रत्ना पाठक-शहा यांनी या वेळी सांगितले.
स्पर्धेत कुल्र्याचे अंजुमन अल्लाना विद्यालय विजेते ठरले तर अंधेरीच्या राजहंस विद्यालय व हंसराज मोरारजी विद्यालय यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.