आपत्तीच्या प्रसंगीही विद्यापीठाच्या परिसराला सुरक्षा पोहोचवणारे कर्मचारी, विद्यापीठाच्या बागेची निगा राखणारे कर्मचारी यांना विशेष भत्ता देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्याचप्रमाणे जवळपास शंभर नव्या तुकडय़ा आणि अभ्यासक्रांना मंजुरी देण्यात आली.

सध्या टाळेबंदीमुळे विद्यापीठाचे कामकाजही थंडावले आहे. मात्र आर्थिक वर्षांच अखेरचा दिवस असल्यामुळे तातडीच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. प्रथमच विद्यापीठाने ऑनलाईन बैठक घेतली. सध्या विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी हे घरी राहून काम करत असले तरी विद्यापीठाचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या बागेची निगा राखणे, विद्युत पुरवठा यंत्रणेची निगा राखणे अशी कामेही कर्मचारी करत आहेत. त्यांना विशेष भत्ता देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. साधारण ५७ सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

राज्यात रक्ताचा तुडवडा आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी यांना रक्तदानाचे आवाहन परिषदेचे सदस्या आणि विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे त्यांची माहिती सिद्धिविनायक ट्रस्टला दिल्यास ट्रस्टचे फिरते संकलन केंद्र कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन रक्त संकलित करणार आहे.

शंभर नव्या तुकडय़ांच्या मंजुरीसाठी आयत्यावेळी धावाधावपुढील शैक्षणिक वर्षांसाठी विविध संस्थांकडून तुकडीवाढ आणि नव्या अभ्यासक्रमाचे १६९ प्रस्ताव आले होते. त्यातील साधारण १०० प्रस्तावांना परिषदेने मंजुरी दिली आहे. मात्र, आयत्यावेळी विद्यापीठाने नव्या तुकडय़ांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवल्याचा सदस्यांनी निषेध केला. शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्याची मुदत मंगळवारी संपणार होती. त्यामुळे विद्यापीठाने घाईघाईने परिषदेची बैठक घेऊन प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले. मात्र प्रस्ताव स्विकारण्याची प्रक्रिया ऑगस्टमध्ये सुरू होते. दरम्यान शासनानेही प्रस्ताव पाठवण्यासाठी मुदतवाढ दिली नाही.