कुल्र्यातील शाळेचा अभिनव उपक्रम

मुंबई : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, जोपासण्यात येणाऱ्या छंदाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कुल्र्यातील एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी कलादालनाचे दालन मोकळे केले आहे. छंद म्हणून गोळा केलेल्या वस्तू, बालचित्रकारांनी रेखाटलेली चित्रे, बालकवींनी रचलेल्या कविता आदी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे सर्वाना दर्शन घडावे म्हणून शाळेतच एक कलादालन सुरू करण्यात आले आहे. तर या शाळेत शिक्षण घेऊन पुढे चित्रकार म्हणून नावारूपाला आलेल्या प्रख्यात चित्रकाराच्या चित्रांच्या प्रदर्शनाने या कलादालनाचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले.

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

प्रबोधन कुर्ला या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे कुर्ला (पश्चिम) येथे प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविण्यात येत आहे. अभ्यासासोबतच मैदानी खेळांवरही शाळेकडून भर देण्यात येत आहे. मैदानी खेळांबरोबरच वक्तृत्व, चित्रकला, निबंध आदी स्पर्धाचेही आयोजन केले जाते. पोस्टाची तिकिटे अथवा अन्य वस्तू साठविण्याचा छंद काही विद्यार्थ्यांना जडला आहे. तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांना चित्र रेखाटण्याचा, काही विद्यार्थ्यांनी कविता रचण्याचा, तर काही विद्यार्थ्यांना मातीपासून शिल्प साकारण्याचा छंद असतो. विद्यार्थ्यांना निबंध लेखनाची गोडी लागावी, विद्यार्थ्यांची मराठी भाषा सुधारावी या उद्देशाने शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत पारितोषिक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे निबंध या कलादालनात मांडण्यात येणार आहेत. अशा बाल कलाकारांनी रेखाटलेल्या कलाविष्कारासाठी  एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शाळा व्यवस्थापनाने शाळेतच एका वर्गखोलीमध्ये छोटेखानी कलादालन सुरू केले आहे.

प्रख्यात चित्रकार सागर साळवे प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि आजघडीला ते एक प्रख्यात चित्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत. प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळतर्फे सुरू करण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन सागर साळवे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाने करण्यात आले. लवकरच शाळेतील निरनिराळे कलाविष्कार जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलेचे प्रदर्शन या कलादालनात मांडण्यात येणार आहे.

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलागुण जोपासण्याची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात पालकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होते. मात्र विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळामध्ये कलादालन सुरू करण्यात आले आहे. लवकरच विद्यार्थ्यांना निरनिराळे विषय देऊन वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलेचे कलादालनामध्ये प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.

– भाऊ कोरगावकर, अध्यक्ष, प्रबोधन कुर्ला