महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे काटेरी सिंहासन असं कायम म्हटलं जातं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं आणि ते पद पाच वर्ष सांभाळून दाखवणं हे कसब भल्याभल्यांना अंगी बाणवावं लागलं. देवेंद्र फडणवीसही त्याला अपवाद नाहीत. त्यांनीही त्यांचं पद ज्या खुबीनं टिकवलं आहे त्याला जवाब नाही. पक्षावर टीका होत असली तरीही मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली इमेज क्लिन ठेवली आहे. त्यांच्या राजकीय परिपक्वतेचं हे उत्तम उदाहरण आहे यात काहीही शंका नाही. अशा सगळ्यात एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे ‘मिसेस सीएम’ची चर्चा जेवढी सध्या रंगली आहे तेवढी याआधी कधीही रंगली नव्हती.

आता परवाचीच गोष्ट घ्या… आंग्रिया या मुंबई-गोवा क्रुझच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच अमृता फडणवीस गेल्या होत्या. मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली क्रुझ म्हणजे आंग्रिया. मात्र या आंग्रियाच्या उद्घाटनापेक्षाही चर्चा रंगली ती मिसेस सीएमनी केलेल्या सेल्फी फोटो शूटची. या क्रुझच्या एका आक्षेपार्ह काठावर जाऊन अमृता फडणवीस बसल्या होत्या आणि त्यांनी सेल्फीही काढला. त्याचे व्हिडीओ शुटिंगही उपलब्ध आहे. मात्र तरीही आज त्यांनी स्पष्टीकरण काय दिलंय? तर म्हणे मी शुद्ध हवेसाठी तिथे गेले होते. तसंच ती जागा सुरक्षित आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणताय तेच खरं असा हा सगळा मामला झाला. कारण पोलीस तुम्हाला विनंती करताना दिसत आहेत. तुम्ही सेल्फी काढत आहात हेही दिसत आहे तरीही तुम्ही तसं काही नाही हो असंच महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करता आहात.

याआधी फेब्रुवारी महिन्यात मिसेस सीएम अर्थात अमृता फडणवीस मुंबईतील नद्यांच्या संवर्धनासाठी आलेला त्यांचा अल्बम सोशल मीडियावर चांगलाच गाजला. या गाण्यात दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनाही ताल धरायला त्यांनी भाग पाडलं. सोनू निगमचं पार्श्वगायन आणि त्यावर हातवारे करणारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या हाती हात घेऊन गाणाऱ्या अमृता फडणवीस यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले. या गाण्यात सुधीर मुनगंटीवार आणि पोलीसही दिसले होते. या गाण्याची चांगलीच खिल्ली सोशल मीडियावर उडाली होती. सैराटमधील ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर आणि ‘राणी माझ्या मळ्यामंदी येशील का?’ ही आणि अशी काही गाणी या व्हिडीओला जोडून पोस्ट करण्यात आली. ज्यामुळे मुख्यमंत्र्यांवर काहीशी टीकाही झाली. मात्र याकडे मुख्यमंत्र्यांनी सपशेल दुर्लक्ष केलं.

टि सीरीजच्या ‘फिरसे’ या म्युझिक अल्बममध्ये अमृता फडणवीस महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकल्या. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत डान्सही केला. या गाण्याचीही चांगलीच चर्चा तेव्हा रंगली होती. या गाण्याची शेवटची टॅगलाइन होती ‘ड्रीम्स कम्स ट्रू’- अर्थात स्वप्न सत्यात उतरताना. कदाचित अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकायचं हे अमृता फडणवीस यांचं हे स्वप्न होतं जे पूर्ण झाल्याचीच टॅगलाइन या गाण्याच्या शेवटी देण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वीच जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला या दिवशी अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेले फोटोही सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्यावर टीका झाली. अनेक महिलांनी अमृता फडणवीस यांचे कौतुकही केले तर अनेकांनी त्यांच्या पोशाखावर टीकाही केली. होय ‘हे माझं सरकार’ या भाजपाच्या घोषवाक्यावरून अमृता फडणवीस यांच्यावर कमेंट्स करण्यात आल्या. ”मी आधी बँकेत काम करून घर चालवायचे पण मला मॉडेलिंग करायचं होतं आणि उत्कृष्ट गायकही व्हायचं होतं. ते आधीच्या सरकारच्या काळात शक्य झालं नाही. पण मग आमचं सरकार आलं मग मी मॉडेलिंग सुरु केलं आणि गाण्याचा अल्बमही काढला. हे शक्य झालं ते फक्त भाजपा सरकारमुळे होय हे #माझं सरकार!” तुमच्या कपड्यांवरून वाटत नाही की तुम्हाला निसर्गाबद्दल प्रेम आहे” या आणि अशा जवळपास ३ हजारांहून जास्त कमेंट्स अमृता फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर आजही उपलब्ध आहेत. मात्र याकडेही अमृता फडणवीस यांनी काय किंवा मुख्यमंत्र्यांनी काय  फारसं लक्ष दिलं नाही.

सत्ता आल्यापासून असे काही प्रसंग घडले ज्यात मिसेस सीएममुळे सीएम अडचणीत येतात की काय असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. हे सगळे कमी म्हणून की काय तर आता आंग्रियावर जाऊन तिथल्या एका आक्षेपार्ह कोपऱ्यावर जाऊन त्या सेल्फी काढत होत्या. टीका झाल्यावर मी सेल्फी काढण्यासाठी गेलेच नव्हते तर शुद्ध हवा खाण्यासाठी गेले होते असंही त्यांनी सांगून टाकलं. एरवी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या पत्नींचे फोटो यायचे ते आषाढीच्या वेळी विठ्ठलाची पूजा केल्यावर. गेल्या चार वर्षात मात्र मिसेस सीएम निरनिराळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. २०१६ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये त्या शो स्टॉपर होत्या. आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची जी इमेज महाराष्ट्राच्या मनात होती ती मोडण्याचा यशस्वी प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केला आहे.

आगामी काळात भाजपाची सत्ता येईल की नाही हे ठाऊक नाही जर आली आणि मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचीच सेकंड टर्म असेल तर अशा आणखी अनेक बदलांना महाराष्ट्र सामोरा जाईल यात शंका नाही. मात्र आजवर अमृता फडणवीस यांनी जे जे काही इमेज मोडण्यासाठी केलं आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात टीकाच होताना दिसली आहे. सुदैवाची बाब एकच की अजून तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यामुळे अडचणीत आलेले नाहीत. मात्र जर भविष्यात असं काही घडलं आणि अडचणी वाढल्या तर मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या पायाशी लोटांगण घेत ‘अमृता’हूनही गोड नाव तुझे देवा असे म्हणायची वेळ आली नाही म्हणजे मिळवली!

समीर जावळे

sameer.jawale@gmail.com