सकाळी ऑफिस कसे गाठायचे? वेळेत ट्रेन मिळेल का? ट्रेन मिळाली तर ती लेट होणार नाही ना? आजही लेटमार्क लागणार नाही ना? अशा हजारो प्रश्नांचे काहूर डोक्यात माजवून आपण रेल्वे स्थानकावर पोहचतो. त्यानंतर आपले भंजाळलेले डोके आणखी उठवतात त्या डोक्यात जाणाऱ्या घोषणा.

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठायचे असेल किंवा दादरला जायचे असेल तर आपण फास्ट ट्रॅकवर आलेलो असतो. अचानक घोषणा होते ‘प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून जाणारी जलद लोकल आज प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून जात आहे.’ धडपडत ट्रेन पकडायची. खचाखच गर्दीतून वाट गाठत फर्स्ट क्लासचा डबा (फर्स्ट क्लासला वर्स्ट क्लास का म्हणू नये? असा प्रश्न मला अनेकदा पडतो) गाठावा आणि आत शिरल्यावर दुसरी एक घोषणा आपल्या डोक्यात जाते. ‘कृपया गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतर याकडे लक्ष द्या.’ म्हणजे प्लॅटफॉर्मची उंची यांनी वाढवायची नाही आणि लक्ष आपण द्यायचे वा रे कारभार!

alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How To Grow Mogra in Small Pot Money Saving Hack
२ रुपयांच्या खडूने मोगऱ्याचं रोप कळ्यांनी गच्च भरून जाईल; लहान कुंडीत फुलबाग सजवण्याचा उपाय, पाहा Video
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

जी गोष्ट कल्याण किंवा डोंबिवलीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठताना ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही.. फास्ट लोकल मिळावी म्हणून घड्याळाशी कसरत करत, सबवेतून धावत जात कसे तरी स्टेशन गाठायचे. त्यानंतर घोषणा होते.. पुन्हा डोक्यात जाणारीच. ‘७.४६ मिनिटांची कल्याणला जाणारी गाडी आज १० ते १५ मिनिटे उशिराने अपेक्षित आहे.’ मग आपण कर्जत किंवा कसारा फास्ट किंवा अगदीच टिटवाळा फास्ट पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करायची. त्यात घोषणा होऊ लागते ‘वरिष्ठ नागरिकांसाठी प्रत्येकी सात सीट राखीव ठेवण्यात आल्या आहेत.’ घोषणा ऐकली की ओरडून सांगावेसे वाटते अहो आम्ही वरिष्ठ नागरिक आले तर त्यांना आमचीही जागा देऊ हो.. पण तुमची घोषणा नको. त्यानंतर आणखी एक घोषणा ऐकू येते ‘विना तिकिट प्रवास करणे हा एक दंडनीय अपराधच नाही तर सामाजिक गुन्हाही आहे’. (अपराध आणि गुन्हा हे दोन्ही समान अर्थी शब्द आहेत याची बहुदा रेल्वे खात्याला कल्पना नसावी) अहो डोंबिवली किंवा कल्याणहून १ हजार ते १२०० रूपये नाही मोजत.

विनातिकीट प्रवासी पकडण्याची हौस असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी ऑफिस अवर्स मध्ये फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासच्या डब्यात शिरून त्यांच्यावर कारवाई करून दाखवा. पण ते काही नाही आपल्याच नशिबी या घोषणा येतात. मध्य रेल्वेवरची हल्लीची प्रसिद्ध घोषणा म्हणजे काही तांत्रिक बिघाडामुळे छत्रपती शिवाजी महाराजकडे जाणाऱ्या सर्व लोकल्स आज उशिराने धावत आहेत, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमच्या दिलगिरीने आमचे समाधान कसे होणार? कशाला फुकटची दिलगिरी बाळगता? दिलगिरी बाळगण्यापेक्षा ट्रेनचे टाईमटेबल जरा व्यवस्थित पाळले ना माझ्यासारखे हजारो लाखो प्रवासी दुवा देतील तुम्हाला. तुम्ही आमच्यातल्या आणि ऑफिसमधला दुवा आहात ही जाणीव ठेवून..

सेंट्रल रेल्वेवर हा ताप तर पश्चिम रेल्वेवर डोक्यात जातात त्या जाहिराती. बरं जाहिरात वेगळी असेल तर ठिक पण एकच गाणे रोज ऐकायचे.. ‘स्वाद सुगंध का राजा बादशहा मसाला!’ आता नाही आवडत आम्हाला असले मसाले तरीही आम्ही ते का वापरायचे? पु.ल. देशपांडे यांच्या ‘नारायण’ नावाच्या कथेत ते म्हणतात एका बाई बरोबर कापड खरेदी करणे म्हणजे मनःशांतीची कसोटी असते. अगदी तशाच प्रकारे मलाही म्हणावेसे वाटते आहे मुंबई लोकलने प्रवास करणे ही मनःशांतीची कसोटी असते.

गर्दीतून वाट काढत, आपल्याला पाहिजे ती जागा मिळवत धक्के खात मुंबईकर प्रवास करतात. त्यात या असल्या घोषणांचा पाऊस त्यांच्यावर पडतच असतो. बॉस काय म्हणेल? आता उद्या काय करायचे? या सगळ्या विवंचनेत आपण असतो प्रवासात आपला सर्वाधिक वेळ जातो आणि त्यातही डोक्यात जातात त्या या घोषणा. कानावर आदळून आदळून त्या पाठ झाल्या आहेत. निदान आता तरी बंद करा.. कामावर येताना आणि घरी जाताना आम्हाला पडलेले प्रश्न कमी नसतात. तेव्हा असल्या घोषणा करून पुन्हा आमचे उरलेसुरले डोके पोखरू नका ही रेल्वे खात्याला नम्र विनंती.

समीर चंद्रकांत जावळे