जेवणाचे डबे तयार करून भिन्नमती मुलांचे आर्थिक स्वावलंबन
अपंग, गतिमंद, भिन्नमती मुलांकडे अवलंबित म्हणून पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन असतो. अशी मुले कुटुंबावर, समाजावर भार असतात, असा समज पाळला जातो. मात्र योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ही मुलेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात. याचेच एक उदाहरण म्हणजे मुंबईतील ‘अर्पण’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारा जेवणाचे डबे पुरवण्याचा उपक्रम. भिन्नमती मुलांनी आपले पाककौशल्य दाखवून तयार केलेल्या जेवणाचे डबे ‘अर्पण’च्या माध्यमातून पुरवले जात असून यामुळे या मुलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग गवसला आहे.
मानसिक व्यंगामुळे ही मुले सर्वसामान्यांसारखी कामे करण्यात कमी पडत असली तरी त्यांच्यातील जिद्दीला प्रोत्साहन दिल्यास तीही सामान्यांप्रमाणे कार्यरत होऊ शकतात. हेच हेरून अर्पण या संस्थेने विशेष गरजा असणाऱ्या मुलांनी तयार केलेला जेवणाचा डबा लोकांना पुरविण्याची कल्पना साकारली. ‘समाजामध्ये मतिमंद व्यक्ती काहीच करू शकत नाहीत असा समज आहे, मात्र या मुलांना शिकविले आणि त्यांच्या कलेने घेतले तर ही मुले दिलेली कामे खूप चांगल्या पद्धतीने आणि चोख करतात,’ असे ‘अर्पण’च्या सुषमा नगरकर यांनी सांगितले. गेले वर्षभर आम्ही विशेष गरजा असणाऱ्या मुलांसोबत काम करीत असून जुहू, सांताक्रूझ पश्चिम आणि खार परिसरांतील ३० ठिकाणी आमच्याकडून डबा पुरविला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
डब्याच्या तयारीसाठी ही मुले कांदा चिरणे, कोशिंबीर बनविणे, भात लावणे अशा अनेक गोष्टी करतात. स्वयंपाक करताना बाजूला उभे राहून त्यांच्याकडून करवून घेतले जाते. सुरुवातीला ही मुले आगीला घाबरत होती, मात्र आता ते कांदा परतण्यापासून सर्व कामे करतात. सध्या या उपक्रमासाठी ४ पूर्ण वेळ आणि २ अर्धवेळ काम करणारी विशेष मुले आहेत. यात चेतन जावळे, नाझमिन कागलवाला, प्रतिभा कामत, आरती नगरकर, आनंद जांभीर, पूनीत अग्रवाल, रयिज अहमग आणि बनी अमान ही विशेष मुले या संस्थेमध्ये कामासाठी येत आहेत. मुले अतिशय उत्साहाने कामामध्ये सहभाग घेत आहेत. या संस्थेत शिकलेले अनेक पदार्थ ते आपल्या घरी करून दाखवीत आहे. आपल्यापेक्षा ही मुले अतिशय जागरूक असून वस्तूंची खरेदी केल्यानंतर बिल घेण्यासाठी आग्रही असतात, असे या संस्थेत काम करणाऱ्या कविता आकरे यांनी सांगितले.

माझी मुलगी सकाळी ‘कामावर जाते’ असे सांगून निघते. तिला स्वयंपाकाची आधीपासून आवड आहे त्यामुळे ‘अर्पण’मध्ये ती मन लावून काम करते. आपण पैसे कमावतो याचा तिला अतिशय अभिमान वाटतो. तिचा आत्मविश्वास दुणावला आहे. आम्हालाही तिचा अभिमान आहे.
– आशा कामत, (संस्थेत कामासाठी येणाऱ्या प्रतिभा कामतची आई)

मीनल गांगुर्डे,