शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विशेष वर्ग

मुंबई : गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात ढकलण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सुरुवातीला आधीच्या वर्गातील घटकांचे अध्यापन करण्यात येणार आहे.

करोनाची साथ राज्यात वाढू लागल्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातील सुधारणेनुसार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गात बसवण्याची तरतूद राज्याने मान्य केली नसल्याने राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पुढील वर्गात प्रवेश दिला जातो. मात्र, तरीही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून ते कशात मागे आहेत हे पाहणे अपेक्षित आहे. यंदा मात्र या शैक्षणिक वर्षांत राज्यातील बहुतेक शाळा ऑनलाइन भरल्या. ऑनलाइन वर्गासाठी पुरेशी साधने नसणे, विद्यार्थी, शिक्षकांचा संवाद विकसित न होणे, सकस अध्ययन सामग्रीचा अभाव अशा अनेक समस्यांना गेल्या शैक्षणिक वर्षांत तोंड द्यावे लागले. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करताच त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी याबाबत शनिवारी माहिती दिली.

राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद लवकरच देईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना ऑनलाइन, दूरचित्रवाणी, स्वयंसेवक यांच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी विभाग प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांचा अपेक्षित कौशल्य विकास झाला आहे का याचीही चाचपणी करण्यात येत आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षभरात मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसत आहे. ते भरून काढण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला तरी सुरुवातीचे दोन महिने आधीच्याच वर्गातील अभ्यासाची उजळणी करण्यात येणार आहे.

नववी, अकरावीचा पेच

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा पेच कायम आहे. नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत. अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे, असा पेच शिक्षण विभागासमोर आहे. सध्या अनेक ठिकाणी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य नाही. मात्र पुढील वर्ष म्हणजेच दहावी, बारावीचे वर्ष हे राज्यमंडळाच्या परीक्षांचे असते. त्यामुळे सरसकट पुढील वर्गात विद्यार्थ्यांना प्रवेश देणेही योग्य नाही. हे लक्षात घेऊन विभागाने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत पुढील दोन-तीन दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.