‘ब्लू व्हेल’चा प्रभाव संपल्यानंतर आता त्यासाठी शाळांमध्ये समिती

विद्यार्थ्यांना हात धुण्याची सवय लावण्यापासून ते गुणवत्तावाढीसाठी शाळांमध्ये विविध गट आणि समित्या शासनाच्या सूचनांनुसार कार्यरत असतात. त्यात आता अजून एकाची भर पडली असून काही महिन्यांपूर्वी पालकांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या ब्लू-व्हेल या संगणकप्रणाली विद्यार्थ्यांनी वापरू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र ब्लू व्हेलवर बंदी आल्यानंतर या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

ब्लू व्हेल खेळामूळे देशांतही यातून काही मुलांच्या आत्महत्या झाल्याच्या शंका घेण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर मुलांनी ब्लू व्हेल खेळू नये यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यासाठी, त्यांना या खेळापासून परावृत्त करण्यासाठी शाळांमध्ये समिती नेमण्याची मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार शाळांमध्ये अशा समित्या नेमण्याची सूचना शिक्षण विभागाने नुकतीच दिली आहे. त्यामुळे शाळांमध्ये कागदोपत्री आणि कधी प्रत्यक्षात असलेल्या खंडीभर समित्यांच्या यादीत भर पडणार आहे. मात्र हे पत्र शिक्षण विभागाने काढेपर्यंत आता ब्लू व्हेल या खेळाचा प्रभावही कमी झाला आहे आणि त्याच्या कर्त्यांना परदेशांत अटकही करण्यात आले आहे.

खेळाचा जीवघेणा प्रभाव

काही महिन्यांपूर्वी रशियामध्ये तयार झालेल्या ब्लू व्हेल या संगणकीय खेळाने पालकांची चिंता वाढवली होती. हा खेळ खेळणारी मुले आत्महत्यांपर्यंत पोहोचल्याचे काही दाखले जगाच्या पातळीवर समोर आले. देशांतही यातून काही मुलांच्या आत्महत्या झाल्याच्या शंका घेण्यात आल्या होत्या.