News Flash

सासू-सासऱ्यांनी टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचा भाग

विशेष न्यायालयाकडून वृद्ध दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर

विशेष न्यायालयाकडून वृद्ध दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : सासू-सासऱ्यांनी टोमणे मारणे वा उपरोधिकपणे बोलणे हा वैवाहिक जीवनाचा भाग आहे, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने मलबार हिल येथील वृद्ध दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. या दाम्पत्याच्या विभक्त झालेल्या सुनेने त्यांच्याविरोधात वाईट वागणूक दिल्याची पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

सुनेने केलेले आरोप हे सामान्य स्वरूपाचे आहेत. उलट सासू-सासऱ्यांनी उपरोधिकपणे बोलणे वा टोमणे मारणे हा वैवाहिक जीवनाचा भाग असून सगळ्याच कुटुंबांत हे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे सुनेने केलेल्या आरोपांसाठी अनुक्रमे ८० व ७५ वर्षांच्या सासू-सासऱ्यांना पोलीस कोठडी सुनावणे आवश्यक वाटत नाही, असे विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी अर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर करताना नमूद केले. मात्र अर्जदार दुबईला पळून जातील, अशी भीती सुनेने व्यक्त केल्याने न्यायालयाने त्यांना पारपत्र पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले.

अर्जदारांच्या दुबईस्थित मुलाशी तक्रार नोंदवणाऱ्या महिलेने २०१८ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवस आधी लग्नाची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करत असताना तिचा पती हा अर्जदारांचा खरा मुलगा नसून त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्यांचा मुलगा आहे आणि त्यांनी त्याला दत्तक घेतल होते, ही बाब तिच्या कुटुंबीयांना कळली. लग्न झाल्यापासूनच सासू-सासरे आपल्याला वाईट वागणूक देत असल्याचा आरोप सुनेने केला होता. तिच्या तक्रारीनुसार लग्नाच्या वेळी सासू-सासऱ्यांनी तिला काहीच भेटवस्तू दिली नाही. याउलट तिच्या आईवडिलांनी तिला १.५ कोटी रुपयांचे हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने भेट दिले. लग्नानंतर सासू-सासरे तिला फ्रिजला हात लावू द्यायचे नाहीत, ते तिला शिळे जेवण देत आणि तिला बाहेरच्या खोलीत झोपायला सांगत असत. तिला आई-वडिलांच्या घरीही जाण्यास सासू-सासऱ्यांनी मज्जाव केला होता. सासू-सासऱ्यांच्या या वागणुकीबाबत पतीला सांगितल्यावर तोही उपरोधिकपणे बोलत असे आणि आई-वडिलांचे ऐकण्यास सांगत असे, असा दावाही महिलेने तक्रारीत केला होता. तिचे दागिनेही त्यांच्याकडेच असल्याचा दावाही तिने केला होता.

तर पतीला दत्तक घेण्यात आल्याची बाब महिलेला माहीत होती. शिवाय लग्नानंतर ती सासू-सासऱ्यांसोबत १० दिवसच राहिली. लग्नाचा खर्चही दोन्ही कुटुंबीयांनी उचलला होता. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची बाबही त्यांची बँक खाती गोठवण्यात आल्यावर त्यांना समजली, असा दावा सासू-सासऱ्यांतर्फे करण्यात आला. तिचे दागिने आपल्याकडे असल्याच्या आरोपाचेही त्यांनी खंडन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 1:38 am

Web Title: special court grants anticipatory bail to elderly couple zws 70
Next Stories
1 मनुष्यवस्तीत सापडणारे साप राणीच्या बागेत ठेवण्यास पालिकेचा नकार
2 वर्षअखेरीची डोंगर भटकं ती थंडावली
3 आभासी क्रीडा स्पर्धामध्ये खेळाडूंना तांत्रिक अडचणींमुळे मनस्ताप
Just Now!
X