पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण कमी; संख्या वाढविण्याकरिता पालिके चा निर्णय

शैलजा तिवले
मुंबई : मुंबईत लसीकरणाने एक कोटीचा टप्पा पार केला असला तरी यात महिलांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे आता महिलांसाठी या आठवडय़ात खास एक दिवस लसीकरण आयोजित करण्यात येणार आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात लससाठा प्राप्त होत असल्यामुळे लसीकरणानेही वेग घेतला आहे. ‘कोविन’च्या आकडेवारीनुसार सोमवापर्यंत मुंबईला एक कोटी तीन लाख ७६ हजार ७१३ लशींच्या मात्रा दिलेल्या आहेत. यात सुमारे ४३ टक्के मात्रा महिलांना, तर उर्वरित ५७ टक्के मात्रा पुरुषांना दिल्या गेल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण कमी प्रमाणात होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’च्या ४ जुलैच्या अंकात ‘पुरुषांच्या तुलनेत महिलांचे लसीकरण कमी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. महिलांमधील लसीकरण वाढविण्यासाठी आता येत्या आठवडय़ात खास महिलांसाठी लसीकरण आयोजित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

‘मुंबईत सुमारे ९० लाखांपैकी सुमारे ४५ लाख लसीकरण महिलांमध्ये झाल्याचे आढळले आहे. महिलांमधील लसीकरण तुलनेने कमी झाले आहे. लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे महिला येण्याचे टाळतात, असेही निरीक्षणातून समोर आले आहे. ही अडचणी दूर करून मुंबईतील सर्व केंद्रांवर एक दिवस केवळ महिलांसाठी लसीकरण आयोजित केले जाईल’, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पालिकेने लसीकरण वेगाने करण्यासाठी कंबर कसली आहे. पालिकेने गेल्या आठवडय़ात दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन लाख ६० हजार नागरिकांसाठी खास लसीकरण आयोजित केले होते.

‘शनिवारी सुमारे दीड लाख दुसऱ्या मात्राधारकांचे लसीकरण केले गेले. याही आठवडय़ात पुन्हा त्यांच्यासाठी लसीकरण आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित जणांचेही लसीकरण पूर्ण होऊ शकेल’, असे काकाणी यांनी सांगितले.

‘रिलायन्स’कडून आणखी दोन लाख लशींच्या मात्रा

झोपडपट्टीत लसीकरण वेगाने करण्यासाठी पालिकेने सामाजिक उत्तरदायित्वातून प्राप्त झालेल्या लशींचा वापर करत आहे. रिलायन्सने तीन लाख लशींच्या मात्रा यासाठी उपलब्ध केल्या होत्या. आणखी दोन लाख मात्रा देण्याचे रिलायन्सने कळविले आहे. त्यामुळे दुर्बल घटकांचे लसीकरण करण्यास मदत होणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.