मंगळवार, १२ जानेवारीपासून देशाच्या किनारपट्टीवर एकाच वेळेस सर्वत्र सुरू होणाऱ्या सागरी सुरक्षा सरावामध्ये मुंबई परिसरातील तेलविहिरींच्या सुरक्षेवर या खेपेस अधिक भर असेल, अशी माहिती नौदलाच्या पश्चिम विभागीय सागरी सुरक्षा कमांडचे अधिकारी कॅप्टन अजय यादव यांनी दिली. म्हणूनच या खेपेस प्रथमच भारतीय हवाई दलाचा समावेशही या सरावामध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय समुद्रामध्ये कोणत्याही क्षणी अडीचहजार व्यापारी नौका असतात. सुमारे लाखभर नौका वर्षभरात या टापूतून प्रवास करतात. त्याशिवाय लहान आकाराच्या सुमारे साडेतीन लाख मासेमारी नौकाही इथे असतात. शिवाय समुद्रात विविध प्रकारच्या वातावरणीय अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे सागरी सुरक्षा ही सर्वात कठीण मानली जाते. या साऱ्या बाबी अधिकृत असल्या तरी घुसखोर अनेकदा त्यातूनच अनधिकृतपणे प्रवास करतात. त्यामुळे त्यांना शोधणे ही कठीण मोहीम असते. म्हणूनच सुमारे १५ यंत्रणांची मोट सुरक्षेसाठी एकत्र बांधावी लागते. त्यात किनाऱ्यापासून ५ सागरी मैलांपर्यंत सागरी पोलीस, त्यानंतर १२ सागरी मैलांपर्यंत तटरक्षक दल व त्यापुढे नौदल अशी जबाबदारी विभागण्यात आली आहे. सागरीच्या एकात्मिक सुरक्षेची जबाबदारीसाठी नौदलावर आहे. यंदा तेलविहिरींच्या सुरक्षेवर भर देण्यात येणार असून त्याचच एक भाग म्हणून हवाई दलालाही समाविष्ट करण्यात आले आहे. सागरी संपत्तीच्या रक्षणासाठी १५ तात्काळ मदत नौका तैनात आहेत. तर एक हजार जणांच्या सागर प्रहारी दलाची निर्मितीही करण्यात आली आहे.

सागरी सुरक्षा सज्जता

देशाच्या संपूर्ण सागरी सुरक्षेसाठी पहिल्या टप्प्यात ४८ तर दुसऱ्या टप्प्यात ३८ रडार्सचे जाळे उभारण्यात आले आहे. विविध यंत्रणांकडून गुरगाव येथील माहिती विश्लेषण केंद्राकडे दिली जाते आणि त्यानंतर त्याचे विश्लेषण करून ५१ केंद्रांकडे ही माहिती पोहोचवली जाते. अशा प्रकारे माहितीचे जाळे निर्माण करण्यात आले असून यंत्रणांना माहितीच्या छाननीसाठी रीअल क्राफ्ट सॉफ्टवेअरही देण्यात आले आहे. याशिवाय मच्छिमार बांधवांना जैवमाहिती कार्ड देण्याचे कामही सुरू आहे.  त्यांच्याशी सतत संवाद सुरू आहे. सीआयएसएफ, बीएसएफ आणि किनारा सुरक्षेसाठी तीन हजार जवान व पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले  आहे.