नामांकित महाविद्यालयांमध्ये मोजक्याच जागा; विज्ञान शाखेच्या अधिक जागा रिक्त

अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या चार प्रवेश फेऱ्या होऊनही महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करू न शकलेल्या सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांसाठी खास प्रवेश फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये हातावर मोजण्याइतक्याच जागा रिक्त राहिल्या आहेत. खास फेरी ही एक स्वतंत्र फेरी असल्याने या फेरीमध्ये महाविद्यालयांचे कटऑफ कसे लागणार याबाबत कोणताच अंदाज बांधणे कठीण आहे. त्यामुळे खास फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम कसा भरावा याची चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.

अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नाही. ७० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळविणारे हे विद्यार्थी आता खास फेरीमध्ये सहभागी असणार आहेत. चार प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर नामांकित महाविद्यालयांच्या जागा बहुतांशी भरल्या आहेत. त्यामुळे चांगले गुण असूनही विद्यार्थ्यांची नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची या फेरीतील संधी हुकलेली आहे. चार प्रवेश फेऱ्यांनतर मुंबई महानगर प्रदेशातील महाविद्यालयांमध्ये एकूण ६९,४३४ इतक्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. तर आरक्षण कोटय़ामध्ये अगदी क्षुल्लक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे या खास फेरीसाठी बहुतांश आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश अर्ज सादर करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

खास प्रवेश फेरीसाठी १० पसंतीक्रम भरणे अनिवार्य आहे. परंतु या फेरीमध्ये अगदी ४० टक्क्यांपासून ते ९० टक्क्यांपर्यंतचे गुण मिळविणारे विद्यार्थी सहभागी असणार आहेत. त्यात नामांकित महाविद्यालयांमध्ये कमी जागा रिक्त असल्याने ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थीही इतर महाविद्यालयांची नावे पसंतीक्रमामध्ये भरणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचे कटऑफ कसे असतील आणि आपल्या गुणांनुसार कोणत्या महाविद्यालयाची निवड करावी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, नामांकित महाविद्यालयांमध्ये कला आणि वाणिज्य शाखेच्या तुलनेत विज्ञान शाखेच्या जागा अधिक प्रमाणात रिक्त असल्याचे दिसून आले आहे. ‘‘मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडील कल कमी होत आहे. वाणिज्य शाखेमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा अधिकांश ओढा हा वाणिज्य शाखेकडे जात आहे,’’ असे रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार देसाई यांनी सांगितले आहे.

‘‘पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीमध्ये आमच्या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या जागा भरतात. या वेळेस मात्र चार फेऱ्या झाल्या तरी मोठय़ा संख्येने या शाखेतील जागा रिक्त आहेत,’’ असे साठय़े महाविद्यालयाचे उपप्राचार्य राजवाडे यांनी व्यक्त केले आहे.