News Flash

मोठी बातमी! सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी

NIA कोठडीत ९ एप्रिलपर्यंत वाढ

संग्रहित (PTI)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्याप्रकरणी अटक असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सचिन वाझे यांना विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं असताना एनआय कोठडीत वाढ करण्यात आली. कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली आहे. यावेळी कोर्टाने सीबीआयला सचिन वाझे यांची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली. चौकशी करण्यासाठी वेळेचं नियोजन करा असं कोर्टाने सीबीआयला सांगितलं आहे.

दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.

आणखी वाचा- सचिन वाझेंचं आणखी CCTV फुटेज आलं समोर; CSMT कडे जाताना कॅमेरात कैद

दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत आणि नंतर ७ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली होती.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती असं सांगितलं होतं. यानंतर ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे मनसुख यांचा मृतदेह सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते.

आणखी वाचा- दाऊद, शिवसेना ते अँटिलिया! नक्की कोण आहेत सचिन वाझे?

मात्र मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळी उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.

आणखी वाचा- “मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट शिजलेल्या बैठकीला सचिन वाझे होते हजर “

वाझेंची महागडी गाडी जप्त
एनआयएने सोमवारी महागडी दुचाकी जप्त केली. एका महिलेच्या नावे नोंद असलेल्या या दुचाकीचा वापर मुख्य आरोपी सचिन वाझे करीत होते, असा दावा ‘एनआयए’ अधिकाऱ्याने केला. गेल्या वर्षी वाझे यांनी दुचाकीवरून काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला होता. त्या सफरीत वाझे यांनी हीच दुचाकी वापरल्याचा संशय आहे. ‘एनआयए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुचाकी दमण येथून जप्त करण्यात आली. या प्रकरणात अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळेल्या स्कॉर्पिओसह आठ महागड्या गाड्या ‘एनआयए’ने हस्तगत केल्या आहेत. त्यात वोल्वो गाडीचाही समावेश असून ती दमण येथून जप्त करण्यात आली होती.

दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट नावाचा वापर करत वाझे यांच्यासाठी एक खोली आरक्षित करण्यात आली होती, अशी माहिती तपासादरम्यान ‘एनआयए’ला मिळाली. या माहितीत तथ्य आढळले असून सीसीटीव्ही चित्रणातून वाझे यांची या हॉटेलमध्ये ये-जा होती, असेही स्पष्ट झाले. एका सीसीटीव्ही चित्रणात ‘एनआयए’ अधिकाऱ्यांना वाझेंसोबत एक महिला आढळली. सोमवारी जप्त करण्यात आलेली दुचाकी याच महिलेच्या नावे नोंद होती, असे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 3:53 pm

Web Title: special nia court allows cbi to interrogate sachin waze in nia custody sgy 87
Next Stories
1 आमदार गीता जैन यांनी नियमांच उल्लंघन करत केलं दुकानाचं उदघाटन
2 “केंद्रीय आरोग्य सचिव सरकारला करोनाबाबत चुकीचे सल्ले देतायत!” डॉ. सुभाष साळुंखेंचा गंभीर दावा!
3 “रोज लसीचा पुरवठा होतोय, मंत्र्यांनी राजकारण बंद करावं”, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!
Just Now!
X