हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालण्यासाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातर्फे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे घेण्यात येणाऱ्या ७२ तासांच्या जंबो ब्लॉकसाठी रेल्वे ‘मैदान’ तयार करणार आहे. हा ७२ तासांचा ब्लॉक यशस्वी व्हावा, यासाठी रेल्वेतर्फे पुढील नऊ दिवस दर रात्री तीन-तीन तास मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्डात विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान ७२ तासांच्या ब्लॉकच्या वेळी होणाऱ्या कामांना पूरक कामे उरकून घेतली जातील.
मध्य रेल्वेवर बुधवारी रात्रीपासून ११ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत रात्री १.३० ते पहाटे ४.३० यादरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्मजवळील रेल्वेमार्गाची डागडुजी, स्टेबलिंग लाइन हटवणे, क्रॉसओव्हरजवळील सिग्नल यंत्रणेची कामे आदी पूरक कामे केली जातील. या ब्लॉकमुळे खालील गाडय़ा रद्द होणार आहेत.
* सीएसटी-अंधेरी (पहाटे ४.२७ वा.), सीएसटी-वांद्रे (पहाटे ४.५२ वा.), वांद्रे-सीएसटी (पहाटे ४.३० वा.), अंधेरी-सीएसटी (पहाटे ५.१७ वा.)
* अंशत: रद्द होणाऱ्या गाडय़ा
* पनवेल-सीएसटी (रात्री ११.४७ वा. वडाळा ते सीएसटी यांदरम्यान खंडित)
* सीएसटी-पनवेल (पहाटे ४.२३ वा. सीएसटी ते जुईनगर यांदरम्यान खंडित)