रंगभूमीवरील विविध मान्यवरांसह नसिरुद्दीन शाह यांची खास उपस्थिती

मुंबई : रंगभूमी आणि चित्रपटातील उद्याचे तारे घडविणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली लगबग अंतिम टप्प्यात आली असून आज, २१ डिसेंबरला माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिर येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत राज्याची लोकांकिका ठरेल. या कलाकारांना शाबासकीची थाप देण्यासाठी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची कार्यक्रमात खास उपस्थिती आहे.

राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सर्वोत्कृष्ट आठ एकांकिकांचे सादरीकरण आज होईल. अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, इत्यादी सर्व पातळ्यांवर स्वतला सर्वोत्तम सिद्ध करणारा गट पारितोषिकाचा मानकरी होईल.

लोकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर या आठ केंद्रांवर पार पडली. त्यात आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या एकांकिका विभागीय अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. विभागीय फेरीचे कडवे आव्हान पार करून प्रत्येक विभागातील सर्वोत्कृष्ट एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडली गेली.

सामाजिक, कौटुंबिक विषय, विद्यार्थ्यांचे प्रश्न, स्त्री जाणिवा, प्रेमकथा, पर्यावरण असे विविधांगी विषय लोकोंकिकाच्या माध्यमातून रंगमंचावर अवतरणार आहेत. यानिमित्ताने तरुण कलाकारांच्या विचारधारेतून आलेला वेगळा विचार प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

विशेष कार्यक्रम

‘आविष्कार’ निर्मित ‘उमगलेले गांधी’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम या वेळी सादर होणार आहे. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ लाभलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कलावंत महात्मा गांधी ंवरील साहित्य आणि विचार कलात्मकरीत्या सादर करतात. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यात सहभागी असतील.

* कुठे – यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा

* कधी – आज, सकाळी ९ वाजता

प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव. प्रवेशिका नाटय़गृहावर प्रयोगापूर्वी अर्धा तास आधी उपलब्ध.

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडत आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. ‘झी टॉकीज’ या स्पर्धेसाठी प्रक्षेपण भागीदारदेखील आहे. तर ‘एबीपी माझा’ न्यूज पार्टनर आहे. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांना चित्रपट-मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रोडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.