केंद्रातील भाजप सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारा  ३७० वा अनुच्छेद रद्द केला, परंतु विशेष दर्जावरच आधारित असलेले इतर मागासवर्गीयांसह (ओबीसी) नव्याने लागू करण्यात आलेले मराठा व आर्थिक दुर्बल वर्गाचे आरक्षणही धोक्यात आले आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करणारा संविधानातील ३७० अनुच्छेद रद्द करण्यात आला, ते बरोबर की चूक हा विषय महत्त्वाचा नाही, परंतु त्यानंतर भाजप सरकारचे धोरण हे समोर आले आहे, असे आंबेडकर म्हणाले. संविधानात अनुच्छेद १४ नुसार कायद्यासमोर सर्व समान मानले गेले आहेत. मात्र अनुसूचित जाती व जमाती वगळता, ओबीसी तसेच केंद्र सरकारने नव्याने देऊ केलेले आर्थिक दुर्बल वर्गाचे व मराठा समाजाचे आरक्षण म्हणजे विशेष दर्जाच आहे. त्यामुळे ज्यांना विशेष दर्जा आहे, तो रद्द करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न दिसतो आहे, त्यामुळे ओबीसी व अन्य आरक्षित वर्गाने आरक्षण हवे की नको, याचा निर्णय घ्यायचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडे १४४ जागांची मागणी

विधानसभा निवडणुकीत १४४ जागा सोडल्या तर काँग्रेसबरोबर युती करण्याची वंचित आघाडीची तयारी आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले. मात्र काँग्रेसबरोबर अद्याप आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी सत्तेवर आल्यानंतर पोलिसांना आठ तास काम तसेच नागरी संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाईल, अशी आघाडीची भूमिका त्यांनी या वेळी जाहीर केली.